मुरूड तालुका हा पर्यटन तालुका असून येथे वर्षाला सात लाख पर्यटक भेट देत असतात काशीद येथील समुद्र किनार्याप्रमाणे सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला हेसुद्धा लोकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. पर्यटकांच्या येण्यावर इथली उपजीविका असून त्यांच्यामुळे स्वयंरोजगार मिळाल्याने लोकांच्या हाताला पैसा व काम मिळत असते मुरूड तालुक्यात सर्वात जास्त पीक हे भात असून येथील शेतकरी आपल्या शेतात विविध प्रकारचे भात पीक घेत असतात येथे सुवर्ण कर्जत, झिना कोलाम आदी विविध प्रकारचे पीक घेतले जाते. मुरूड तालुक्याचे 3900 हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. शेतकर्यांचे प्रमुख पीक हे भात असून बहुसंख्य शेतकरी हेच पीक घेत असतात. यंदा मुरूड तालुक्यात मागील वर्षापेक्षा जास्त पाऊस बरसल्याने मुरूड तालुक्यातील शेती पाण्याखाली गेली होती. दिवसाला 165 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याने जिकडे तिकडे पाण्याचेच राज्य होते. शेतात पाणी साचल्याने शेती पाण्याखाली गेली होती. जिथे पाहावे तेथे पाणीच पाणी त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. खूप मेहनतीने आलेले पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी दुःखी झाला होता. निसर्गाने अवकृपा केल्याने या अस्मानी संकटाला तोंड कसे द्यावे हा मोठा प्रश्न पडला होता. आतापर्यंत मुरूड तालुक्यात 2758 मिलीमीटर एवढा पाऊस पडला असून, अजून काही दिवस बाकी आहेत. मागील वर्षीपेक्षा जास्त पाऊस या वेळी बरसला आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने तालुका कृषी अधिकारी सुरज नामदास यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यंदा सर्वाधिक पाऊस पडला आहे साधारणतः 155 हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुरूड तालुक्यातील जोसरंजन शिघरे वावडूनगी, वाणदे, सायगव, जमृतखर, सावली, टोकेखर, तेलवडे आदी गावांना या पाण्यामुळे फटका बसला आहे. कृषी खात्याकडून पंचनामे करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. या पंचनाम्यात आम्ही फळझाडांचीसुद्धा माहिती घेत आहोत. गावागावांत तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक पंचनामे करीत आहेत. आमच्याकडे खाडीलगतच्या शेती पाण्यात वाहून जाणे. पिकाचे नुकसान व फळझाडांचे नुकसान अशा विविध प्रकारचे गटवारी पंचनामे सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी दिली, तर या मुसळधार पावसाची माहिती सांगताना मुरूड तहसीलदार परीक्षित पाटील यांनी सांगितले की यंदा या मुसळधार पावसामुळे शंभरहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. कोणाची भिंत पडणे, छप्पर उडून जाणे, गुरे ठेवण्याचा गोठा पडणे, झाड घरावर पडून घराचे नुकसान अशा विविध घटना घडून संपूर्ण मुरूड तालुक्यात 15 लाखांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाले. आतापर्यंत मुरूड तहसील कार्यालयामार्फत 30 ते 40 जणांना नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती या वेळी त्यांनी दिल्ली आतापर्यंत मुरूड तालुक्यात शंभर टक्के पाऊस पडल्याने सर्व धरणे विहीर व तलाव तुडुंब भरले आहेत. पावसाचे अजून काही दिवस शिल्लक असल्याने अजून पडणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले. या पावसात सार्वजनिक बांधकाम खात्याचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. छोटे पूल रस्ते आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकंदर या पावसाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणून अपरिमित हानी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी वर्गांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले की, दोन गावांना जोडणारे पूल त्याचप्रमाणे साकव हे मुसळधार पावसामुळे वाहून गेले आहेत.संततधार पावसामुळे डांबर निघून गेल्याने खड्डेसुद्धा पडले आहेत. पावसामुळे बांधकाम खात्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, काही चांगल्या स्थितीत असणारे रस्ते सुद्धा खराब झाल्याने आम्हाला आता नवीन निधीची मागणी करावयास लागणार आहे.
एकंदर या जोरदार पावसाने सर्व क्षेत्रात, तसेच शेतकरी व सामान्य नागरिकांचे आतोनात नुकसान झाल्याने लोक हवालदिल होऊन असा पाऊस नसावा असे म्हणू लागले आहेत. या जोरदार पावसाचा फटका कोळी बांधवानासुद्धा सहन करावा लागला आहे.आगस्ट महिन्यात मच्छीमारी सुरुवात होते, परंतु या वेळी मात्र नेमका आगस्ट महिन्यातच जोरदार पाऊस व वार्यामुळे असंख्य कोळी बांधवाना मच्छीमारीसाठी जाता आले नाही. समस्त कोळी समाज आता समुद्र शांत होण्याची पावसाचे प्रमाण कमी होण्याची वाट पाहात आहे. या सर्व घटनांवरून असे दिसून येते की पाऊस नसला तरी लोकांना तो हवा असतो, परंतु पाऊस जास्त झाला तर मात्र नुकसान व पूर परस्थितीही लोकांना नकोशी वाटू लागते. शेवटी निसर्ग कोणालाही काही वाटो अगर कसे याचा विचार करीत नाही.निसर्गावर मनुष्य हा अवलंबून आहे.
-संजय करडे