पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेतर्फे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. पनवेल महानगरपालिकेंतर्गत राहणार्या कुष्ठपीडित नागरिकांच्या विविध समस्यांसंदर्भात हे निवेदन देण्यात आले आहे.
यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील कुष्ठपीडितांना महापालिकेने प्रतिमहा रु. 2500 विशेष अनुदान मंजुरी देण्यात आलेली आहे, परंतु सध्याच्या वाढत्या महागाईमुळे मिळणार्या अल्प रकमेतून त्यांच्या कुटुंबीयांची उपजीविका होणे शक्य होत नाही. म्हणून विशेष अनुदानात दरमहा किमान 5000 वाढ करावी. सन 2001च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या सुमारे 2.64% यापैकी सुमारे 8% लोकसंख्या ही कुष्ठपीडित आहे. त्यानुसार कुष्ठपीडितांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्याचे आदेश आहेत, परंतु पनवेल महानगरपालिका हद्दीतील कुष्ठपीडित बांधवांना या योजनेचा लाभ दिलेला नाही. तो लाभ लवकरात लवकर कुष्ठपीडितांना देण्यात यावा.
तसेच कुष्ठपीडित नागरिकांच्या मुला-मुलींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पनवेल महानगरपालिका सेवेमध्ये समाविष्ट करावे, अशा विविध मागण्यासंदर्भात हे निवेदन देण्यात आले. या वेळी संस्थेचे सल्लागार नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, अध्यक्ष भूपाल फिरगाणे, सचिव अशोक आंबेकर, कुष्ठरोग तंत्रज्ञ अर्जुन ठाकूर, हर्षल जाधव, संजय जाधव आदी उपस्थित होते.