Breaking News

पूरग्रस्तांना वाढीव मदत द्या; विरोधी पक्षनेते फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी, दबाव आणून संघर्ष करण्याचाही इशारा

सांगली ः प्रतिनिधी

पुरामुळे यंदा राज्यात झालेले नुकसान 2019च्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना वाढीव मिळणे आवश्यक आहे. पुरामुळे बाधीत झालेल्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी याकरिता राज्य सरकारवर दबाव आणून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संघर्ष करू, असा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते सांगलीत बोलत होते. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद प्रवीण दरेकर हे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी गुरुवारी (दि. 29) सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणांना भेटी देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. खासदार संजय पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील हेही दौर्‍यात सहभागी होते. दरडग्रस्तांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. सांगली जिल्ह्यात खूप मोठे नुकसान झाले आहे. सर्वसामान्य माणसांपासून शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान पाहायला मिळत आहे. 2019मध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफच्या निकषापलीकडे जाऊन सर्व पातळ्यांवर पूरग्रस्तांना, शेतकर्‍यांना मदत केली होती. या वेळी अधिक नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिक नुकसानभरपाई मिळायला हवी. आपल्या सर्व मागण्या राज्य सरकारकडे मांडण्यात येतील. त्यांची पूर्तता होण्याण्यासाठी सरकारवर आपला दबाव असेल आणि पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असे फडणवीस म्हणाले. राज्य सरकारकडून अधिक मदत मिळवण्यासाठी भाजप आग्रही असेल. केंद्राकडून राज्याला मदत मिळाली असून पूरग्रस्तांनी खचून जाऊ नये. या संकटातून बाहेर पडाल, असा विश्वासही फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना चिपळूणच्या नागरिकांनी धरले धारेवर

चिपळूण ः राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूणला भेट देऊन पाहणी केली. या वेळी स्थानिकांना त्यांना धारेवर धरले. ‘तुम्ही पर्यावरणमंत्री आहात, कोकणात काय चाललंय हे पाहिलं आहे का,’ अशी विचारणा आपले सर्वस्व गमावलेल्या संतप्त चिपळूणकरांनी ठाकरेंना केली. कोकणात पावसामुळे अनेक ठिकाणी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. महापूर, भूस्खलनात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. असे असताना आधी पंचनामे आणि नंतर मदत, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे आपत्तीग्रस्त लोक चिडले आहेत. त्याचाच प्रत्यय चिपळूणमध्ये आला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे या ठिकाणी पाहणीसाठी आले असता, नागरिकांनी आपली कैफियत मांडली तसेच प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना सुनावले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply