Breaking News

पूरग्रस्तांना 51 हजारांची मदत

उरण : कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून उलवा नोडमधील 40+मास्टर्स सामाजिक कला क्रीडा मंडळ उलवा नोड यांच्या माध्यमातून 51 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. कोल्हापूर-सांगलीत मुसळधार पावसामुळे कधी नव्हे तो महापूर आला. या महापुरामुळे माणसं गुरेढोरे यांचा बळी गेले, तसेच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना मदतीसाठी कला क्रीडा मंडळातर्फे या परिसरातील सर्व संघातून जमा केलेली एकूण 51611 रुपये रक्कम पूरग्रस्त निधी कडे जमा करण्यात आली.

घर देतो म्हणून फसवणूक

पनवेल : विचुंबे येथील इमारतीमध्ये रूम देतो, असे सांगून त्या रूमची परस्पर विक्री करून बांधकाम व्यावसायिकाने साडेतीन लाखांची फसवणूक केली आहे. नेरूळ येथे राहणारे अनिल सीताराम जाधव यांनी बाबा ग्रुप बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे विकसक योगेंद्र प्रताप सिंग यांच्या नवीन पनवेल या ऑफिसमध्ये ही रक्कम त्यांना दिली होती. खांदेश्वर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाबा ग्रुपचे भागीदारी योगेद्र प्रतापसिंग, नासिरअली तय्यबअली शेख, रईस अहमद नूर मोहब्बत शेख अशी तिघांची नावे आहेत.

मारहाण करणार्‍या तिघांविरोधात गुन्हा

पनवेल : डोक्यावर लाकडी दांडकाच्या सहाय्याने मारहाण करून जखमी करणार्‍या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसिंग गौरीशंकर सिंग (वय 33 वर्षे) यांचा रियल इस्टेट एजंटचा व्यवसाय असून ते सेक्टर 36, खारघर येथे राहत आहेत. ते त्यांचे कार्यालय बंद करून दुचाकीने घरी जात असताना अ‍ॅडव्हान्स हाइट्स बिल्डिंगसमोर पापडीचा पाडाकडे जाणारे रस्त्याने जात असताना खड्ड्यांमुळे अक्टिवा बाईक थांबवली. या वेळी पाठीमागून आलेल्या एहसान व त्यांच्या मित्राने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. या वेळी सिंग यांचा मोबाईल व खिशातील पैसे कुठेतरी पडून गहाळ झाले आहेत. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे ते तिघे पळून गेले. खारघर पोलिसांनी एहसान बारीक शेख (मूळ रा. मुजफ्फरपूर, बिहार) व अन्य दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अन्न औषध प्रशासनाकडून खाद्यविक्रेत्यांची तपासणी करावी

उरण : मनुष्याचे आरोग्य योग्य राहण्यासाठी चांगले, पोषक व स्वच्छ अन्नपदार्थ खाणे फार गरजेचे आहे. या चांगल्या व स्वच्छ अन्नपदार्थावर देखरेख ठेवण्याचे काम हे अन्न औषध प्रशासन विभागाकडून केले जाते. अन्न औषध प्रशासन विभागाच्या कामाला नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. अन्न औषध प्रशासनाकडून शहरातील सर्व खाद्यविके्रत्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. शहरातील हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते, दुकानातील खाद्यपदार्थांची तपासणी करून हे पदार्थ खाणे योग्य आहेत का? ते बनवताना नागरिकांच्या आरोग्याला फायदेशीर ठरतील का? हे तपासण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पावसाळा आला की शहरात साथीचे आजार पसरण्यास सुरुवात होते. रस्त्यावर बसणारे फेरीवाले, खाद्यविक्रेते हे व्यवस्थित साफसफाई व स्वच्छ पाणी वापरत नसल्यामुळे त्या ठिकाणीचे पदार्थ खाल्ले की अनेकांना साथीच्या रोगाची लागण होते. त्यामुळे या सर्व दुकानांची तपासणी करून त्यांना परवाना देणे गरजेचे आहे. परवाना दिल्यामुळे त्या दुकानांची, हातगाडी चालकांची नोंद मिळेल व त्यांची तपासणी करणे सोपे जाईल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply