श्रीवर्धन : प्रतिनिधी
तालुक्यातील कोंडविळे गावच्या समुद्रकिनार्यावर बुधवारी (दि.21) सकाळी जीवंत मगर आढळल्याने पर्यटक व ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. समुद्रकिनार्यावर मगर सहसा आढळत नसल्याने येथे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कोंडविळे समुद्रकिनार्यावरील रेतीमध्ये बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मगर चालत असल्याचे परिसरातील काही ग्रामस्थांना दिसले. त्यानंतर या मगरीला पाहण्यासाठी गर्दी पाहण्यासाठी व तिचे फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती. काही लोकांनी तिला पकडण्याचा प्रयत्नही केला पण, ती क्षणार्धात समुद्राच्या पाण्यात लुप्त झाली. वनविभागाच्या अधिकार्यांना याबाबत माहिती मिळताच वनक्षेत्रपाल श्री. राऊत, वनपाल एच. एल. नाईक, वन रक्षक दीपक शिंदे, दिनेश जिराने, बुराना शेख यांनी कोंडविळे समुद्र किनार्यावर जावून या मगरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण मात्र मगर पाण्यात गेल्याने तिचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.