Breaking News

मराठी साहित्यात स्त्रियांचे विविधांगी लिखाण

मराठी साहित्याच्या इतिहासात स्त्री संतकवींनी काही प्रमाणात आपले योगदान दिलेले दिसून येते, परंतु गेल्या शतकभरात स्त्रियांनी साहित्यविश्वात मोठ्या प्रमाणात भर घातली आहे. नुकत्याच झालेल्या मराठी राजभाषा दिनानिमित्त या सर्व स्त्री लेखिकांच्या कार्याचा घेतलेला आढावा…

गेल्या काही वर्षांत साहित्यविश्वात अनेक नवनवीन लेखक-लेखिका उदयास आल्या. साहित्यक्षेत्राच्या क्षितिजावर नवीन तारे-तारका चमकताना दिसतात. शिक्षणाचा प्रसार व सामाजिक जाणीव निर्माण झाल्यामुळे हा परिणाम दिसून येतो. अनेक महिला लेखन करत आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा वाङ्मय रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कादंबरीचा कालखंड बाणभट्टाच्या कादंबरीपासून सुरू झाला असे समजण्यात येते, पण मराठी साहित्यातील पहिल्या स्त्री कादंबरीकार बाळूताई खरे. यांचे माहेरचे नाव मालतीबाई विश्राम बेडेकर. 1905 ते 2001 या काळात विभावरी शिरूरकर या टोपण नावाने त्या ओळखल्या जात. स्त्री प्रश्नांना वाचा फोडणारे लेखन, सामाजिक जाणीव व स्त्री प्रश्नासंबंधी तळमळ हे त्यांच्या वाङ्मयीन लेखनाचे एक वैशिष्ट्य. ‘हिंदोळ्यावर’ (1933) या कादंबरीत त्यांनी हुंडा व कायदा हे प्रश्न मांडून स्त्रीला प्रथम जागे केले. 1950ला ‘बळी’ या कादंबरीतून आदिवासींचे प्रश्न व त्यांचे जीवन रेखाटले. ‘शबरी’, ‘विरलेले स्वप्न’, ‘खरे मास्तर’, ‘पारध’ अशा त्यांच्या अनेक गाजलेल्या कादंबर्‍या आहेत. त्यामुळे स्त्रिया लिहीत नाहीत हे म्हणणे चुकीचे ठरेल.

काशीबाई कानेटकर यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. शिक्षण न घेताही त्यांनी मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषांमधून लिखाण केले. वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालेल्या या लेखिकेला पती गोविंदराव कानेटकर यांचा पाठिंबा मिळाला व त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. ‘रंगराव’ व ‘पालखीचा गोंडा’ या त्यांच्या दोन कादंबर्‍या आहेत.

सुमती क्षेत्रमाडे यांच्या ‘महाश्वेता’ व ‘अनुहार’ या दोन स्त्री प्रश्नावर प्रकाश टाकणार्‍या कलाकृती. महाश्वेतामध्ये कोडाचा प्रश्न मांडून रूप म्हणजेच सर्व का? या प्रश्नाला वाचा फोडली आहे, तर अनुहारमध्ये गौरांङ् महाप्रभू म्हणजेच चैतन्य महाप्रभू हे मोठे संत बंगालमध्ये होऊन गेले. त्यांची पत्नी विष्णुप्रिया अनुहार म्हणजे आकृती प्रतिमा या अर्थाने या कादंबरीला हे नाव दिले आहे. मुस्लीम समाजाच्या जाचाला कंटाळून लोक भिऊन धर्मांतर करू लागले. गौरांङ् प्रभूंनी हिंदू समाज कसा संघटित केला व या कार्यात त्यांची पत्नी विष्णुप्रिया आपले कर्तव्य कसे पार पाडते हेच सर्मथपणे चित्रित करून धर्मांतराच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे.

शांता शेळके (1922 ते 2002) यांनी अनेक पुरस्काराने सन्मानित झालेल्या ‘ओढ’, ‘धर्म’, ‘पुर्नजन्म’ अशा अनेक कादंबर्‍यांसोबतच लुइसा (जन्म 1832 जर्मन टाऊन) या अमेरिकन लेखिकेचा ‘गुड वाइव्हज’ यांचा अनुवाद ‘चौघीजणी’ या नावाने केला. कुसुम बेदरकर यांच्या ‘मामलेदाराचा वाडा’ यात स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती याचा गंधसुद्धा नसणारी म्हातारी यात उभी केली आहे. म्हातारीने तिच्या कर्तृत्वावर स्वातंत्र प्राप्त केले. ते मागून नाही, तर कर्तृत्वावर मिळवावे लागते, अशी स्त्री कर्तृत्वाची कहाणी आहे.

मधुरा जसराज या पंडित जसराजांच्या पत्नी. ‘रज्जो’ ही कादंबरी नजीर खाँ साहेबाच्या स्वरांच्या भोवती फिरते. उस्ताद धग्गो व रज्जो यांचे हळूवार प्रेम लेखिकेने रेखाटले आहे. आजच्या विकृत प्रेमाच्या या काळात रज्जोचे प्रेम मनाला भुरळ घालते. त्या काळात जेव्हा ठरवून विवाह होत. त्याच काळात हे प्रेम लेखिकेने रेखाटून पे्रमप्रश्नाला वाचा फोडली आहे. योगिनी जोगळेकर यांनी अनेक कादंबर्‍यांचे लिखाण केले. कुटुंब, समाज व स्त्रीची होणारी ओढाताण हे विषय त्यांनी सातत्याने मांडलेले दिसतात. ‘बावनकशी’, ‘दहीहंडी’, ‘बापलेक’, ‘व्हिडीओ’, ‘सत्कार’, ‘कसरत’ अशा अनेक कादंबर्‍यांतून अनेक प्रश्न उभे केले आहेत. नोकरी करणारी स्त्री, सासरी जाऊन राहणारी स्त्री अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे.

मालतीबाई दांडेकर 1930 पासून मराठी साहित्याला एक लेखिका मिळाली. ‘स्त्री’, ‘माहेर’, ‘यशवंत’, ‘रत्नाकर’ इत्यादी मासिकांतून त्यांनी लिखाण केले. नारदासारखी त्यांची लेखणी चौफेर संचार करते. नाटक, कविता, कथा, कादंबरी, संशोधन, लोकसाहित्य इ. सामाजिक क्षेत्रातील सुधारणेचाही विचार स्त्रीच्या दृष्टिकोणातून त्यांनी केला. त्यांच्या लेखनात स्त्री स्वभावावे अनेक बारकावे, जुने संस्कार व पुरोगामी विचार यांचा समतोल आढळतो. सौ. सुशिला गुप्ते-ठाकरे (8 नोव्हेंबर 1922) सामजिक कार्यात हिरिरीने भाग. चार कादंबर्‍या, दीडशेहून अधिक कथा. या प्रबोधनकार ठाकरे यांच्या तृतीय कन्या. ‘लागो न दृष्ट माझी’, ‘आई तुझी आठवण’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या. डॉ. स्वाती कर्वे (1850 ते 1950) परंपरा व आधुनिकता यात सापडलेल्या मराठी स्त्रीच्या सृजनशील, संवेदनशीलतेचे बहुरंगी दर्शन त्यांच्या लिखाणातून आढळते.

निर्मला गोखले यांच्या ‘रखरखीत सावली’, ‘रेशीम धागे’, ’राहिले ते गंगाजल’, ‘अपेशी’ यातून त्यांनी सामाजिक प्रश्नावर लिखाण केले आहे. 80 कथा, पुस्तक परीक्षण असे त्यांचे लेखन आहे. प्रतिभा हंप्रस यांची ‘बयो’ ही कादंबरी. 60-70 वर्षांपूर्वीचा काळ ‘बयो’त आहे. त्या वेळचा समाज कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती, रूढी-परंपरा, अंधश्रद्धा व नीतीमूल्यांचा प्रभाव या सर्वांचं चित्रण, जीवनसंघर्ष करत कुटुंबाला प्रगतिपथावर नेणारी बयो. ‘सूर्यकन्या सावित्री’ ही मृणालिनी फळणीकरांची लघुकादंबरी. सावित्री साक्षात सूर्यकन्या. तेजोमय, धगधगता अग्नी, भस्म करण्याची क्षमता असणारी, पण आपल्या लाघवी बोलण्याने सत्यवानाला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. केवळ पतीच नव्हे तर राज्य, सासू-सासरे यांचे डोळे परत आणणारी तेजोमय सावित्री त्यांनी उभी केली आहे. विस्कटलेल्या कुटुंबसंस्थेला, आजच्या तरुण पिढीला सावित्री मार्गदर्शक ठरते.

डॉ. विजया वाड यांनी ‘जीवन हिंदोळा’ यात एड्स रुग्णांच्या भावविश्वातील कथा रेखाटली आहे, तर सरोजनी सारंगपाणी यांनी टेस्ट ट्युब बेबीचा विषय हाताळला आहे. सरोजनी बाबर यांच्या कवितेतून, लोकसाहित्यातून समाजजीवन समोर येते. कुमुदिनी रांगणेकरांच्या ‘चार उणे एक’, ‘ढगाळलेले आकाश’, कुसुम अभ्यंकरांच्या ‘हरे राम कृष्ण’, ‘सुड’, ‘विकेशी’मध्ये केशवपनाचा प्रश्न समोर आणला आहे. शकुंतला गोगटेंची ‘विपरीत’, ‘चंदनाची उटी’. शैलजा राजेंच्या अनेक कादंबर्‍यांपैकी ‘आव्हान’ ही साहसपूर्ण चित्तथरारक लघुकादंबरी आहे. वैजयंती काळेंची ‘मोरपंखी’ सरस. या लेखिकेने आपल्या लेखणीतून अनेक प्रश्नांना वाचा फोडली.

स्त्रिया आजही विविध विषयांवर लिहीत आहेत. अलीकडेच म्हणजे 1 मार्च 2017ला सुलभा राजीव यांची ‘येसुबाई’ ही कादंबरी आली. साधारण 350 वर्षांपूर्वी स्त्रियांवर अनेक बंधने होती. मोगलांच्या कैदेत 30 वर्षे येसुबाईने काढली. संभाजीचे बलिदान न विसरता लहान मुलासह छावणीबरोबर हिंडत अस्थिर आयुष्य जगतानासुद्धा येसूने आपली अस्मिता कशी जपली यांचा धीरोदात्तपणे 30 वर्षांचा संघर्ष शब्दात मांडण्याचे महान काम या लेखिकेने केले आहे.

आजही स्त्री वेगवेगळ्या विषयांवर कथा, कविता, लेख यातून आपले विचार मांडताना दिसतात. लेखिका विविध विषयांवर लिहीत नाहीत म्हणणे चुकीचे आहे. स्त्री लेखिकांनी सर्व विषयांवर लेखन केले आहे. माझ्या ‘जान्हवी तिरी’त मी सीलिंग अ‍ॅक्टचा प्रश्न मांडला आहे. ‘उद्ध्वस्त’मध्ये आजचे कुटुंब विभक्त का होतात हा प्रश्न आहे. ‘झणत्कार’मध्ये रंगेल संस्थानिक आहे. स्त्री लेखिकांनी विविध विषयांवर भाष्य करून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. केवळ मनोरंजनासाठी पाहिल्या गेलेल्या या साहित्य कलाकृतीतून लेखिकांनी समाजजीवन, कुटुंबसंस्था, क्रांतिकारी जीवनयुद्ध, सुनामी, पूर, दुष्काळ, बॉम्बस्फोट, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, दुष्काळ, हुंडाबळी, वेश्या, अत्याचार, शाळेचे डोनेशन, परीक्षापद्धती, तृतीयपंथी यासारखे विषय व असे अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नव्हे तर समर्थपणे या प्रश्नांना वाचा फोडली आहे, तसेच बारबालांवर स्त्रियांनी लिखाण केले आहे, पण हे लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा मोठ्या लेखक-लेखिकांसमोर नवीन लेखिकांचा विचार केला जात नसावा.

आज साहित्यक्षेत्रात सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो प्रकाशन व वितरण होत नसल्याने प्रकाशकांनी भाव वाढवले. सर्वसामान्य लेखकांना ते परवडत नाहीत. मग प्रकाशक रक्कम न देता पुस्तके छापून देतात. त्यामुळे लेखकासमोर आज वितरणाचा मोठा प्रश्न आहे आणि वितरण न झाल्याने लेखक-लेखिका वाचकांपर्यंत पोहचत नाहीत, तसेच व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक या आयटीच्या जगात दीर्घ वाचनाची आवड कमी होत आहे आणि म्हणून लेखक-लेखिकांनी लिहूनही या लेखिकांची कोणी मोठे साहित्यिक दखल घेत नाहीत. म्हणून असे म्हणावेसे वाटते की लेखिका लिहीत नाहीत असे नाही, स्त्री आज समर्थपणे लेखणी सांभाळत आहे आणि विविध विषयांवर अभ्यासही करत आहे. मला एवढेच म्हणायचे आहे की या सर्वाची दखल घेतली जावी. सोशिकता, त्याग, पारंपरिक मूल्यांच्या उदात्तीकरणाबरोबरच घटस्फोट, पुनर्विवाह, आरक्षणातून नोकर्‍या न मिळाल्याने एक वर्ग परदेशात गेला आणि वृद्धाश्रम निर्माण झाले, वाडे ओस पडले हे विषयही स्त्री लेखनात आलेले आहेत. त्यामुळे स्त्री लेखिकांचे लेखनही नक्कीच सर्वंकष म्हणावे लागेल. मराठी राजभाषा दिनानिमित्त या सर्व स्त्री लेखिकांना मानाचा मुजरा.

-मीनल वसमतकर, कामोठे

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply