भारतीय हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच पिसाळलेला आहे.त्यामुळेच सीमेवर भारतीय हद्दीत घुसखोरी करून गोळीबार करण्याबरोबरच लढाऊ विमाने सोडण्याचा सपाटा पाकने सुरू केला आहे, पण त्याला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत असून, पाकने अशाच कारवाया सुरू ठेवल्या, तर त्याचे तीव्र पडसाद सीमेवर उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने सोमवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर हद्दीत जोरदार हवाई हल्ले करून जैश या अतिरेकी संघटनेचे अड्डे उद्ध्वस्थ केल्याने पाकिस्तान चांगलाच पिसाळलेला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पिसाळलेल्या पाकिस्तानला योग्य तो धडा शिकविण्याची वेळ आता भारतावर आलेली आहे. भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केला आहे. त्या गोळीबाराला भारताच्या जिगरबाज सैन्यानेही चोख प्रत्युत्तर देत हम भी कुछ कम नही हे कृतीने दाखवून दिलेले आहे. अशा प्रकारे गोळीबार करून पाकिस्तान सीमेवर विनाकारण तणावाचे वातावरण निर्माण करीत आहे. सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असून, भारतीय हल्ल्याने पाकचे डोके फिरल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. भारताने दहशतवादाविरोधात सुरू केलेल्या या संघर्षाला आता जगभरातूनही पाठिंबा मिळू लागला आहे. अमेरिका, जपान, इस्त्रायल, रशियासारख्या देशांनी तर भारताने केलेल्या या कारवाईचे समर्थन करताना पाकिस्तानलाच तंबी देत दहशतवादाला आसरा देण्याचे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही अमेरिका, चीन या राष्ट्रांच्या प्रमुखांशी चर्चा करून भारताची भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारताने दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईनंतर पॉम्पियो यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याशी सुरक्षाविषयक सहकार्याबाबत बोलून क्षेत्रात शांती आणि सुरक्षा राखण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्ताननेही लष्करी कारवाई टाळून निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना सांगितल्याचे पॉम्पियो यांनी म्हटले आहे. आम्हाला दोन्ही देशांदरम्यान शांती हवी असल्याचेही पॉम्पियो यांनी नमूद केले आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष टाळला गेला पाहिजे. दोन्ही देशांनी लष्करी कारवाईपासून दूर राहत संवादाला प्राथमिकता द्यावी, असे आवाहनही पॉम्पियो यांनी निवेदनाद्वारे केले आहे. अमेरिकेबरोबरच चीनने देखील पाकला फटकारत दहशतवादाला आसरा देण्याचे बंद करा, असा सज्जड दम दिला आहे. याचाच अर्थ पाकपुरस्कृत दहशतवादाला आता जगाचाही विरोध होऊ लागला आहे. एकीकडे सारे जग दहशतवादाला विरोध करीत असताना पाकिस्तान मात्र अतिरेक्यांना आसरा देत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे पाकला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याच्या मागणीला पुष्ठी मिळत आहे. हे असेच होणार असेल तर एक दिवस पाकिस्तानचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांवर दहशतवादी आणि लष्कराचे वर्चस्व आहे. त्यामुळेच ते सांगतील त्याचप्रमाणे तेथील राज्यकर्ते वावरत आहेत. हे टाळणे सर्वस्वी पाकिस्तानच्या हातात आहे, पण भारताविरुद्ध संघर्ष जारी ठेवणे एवढेच काम पाकचे राज्यकर्ते करीत आहेत.