शेकाप सभापतीविरोधात गुन्हा दाखल
उरण : प्रतिनिधी
उरण पंचायत समितीचे शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान सभापती अॅड. सागर कडू यांनी चाणजे महसुली गावाच्या क्षेत्रात हवी असलेली जागा घर बांधण्याकरिता देतो, असे सांगून तब्बल आठ जणांची 52 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात सभापती अॅड. कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने उरण तालुक्यात
खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार उरण पंचायत समितीचे सभापती अॅड. सागर सदानंद कडू यांनी ऑक्टोबर 2012 ते आजपर्यंत चाणजे महसुली गावाच्या क्षेत्रामधील सर्व्हे नं. 152, हिस्सा नं. 4, क्षेत्र 0-12- 9 या क्षेत्रामध्ये फिर्यादी रवींद्र मानाजी गावंड (रा. ओमकार कॉलनी, कुंभारवाडा, उरण) यांच्यासह एकूण आठ जणांना चाणजे महसुली क्षेत्रामध्ये घर बांधण्याकरिता हवी असलेली जागा देतो, असे जागाविक्रीचे नोटरी खरेदीखत करून त्या बदल्यात फिर्यादींकडून चार लाख रुपये धनादेशाद्वारे स्वीकारले, मात्र त्यानंतर फिर्यादी रवींद्र गावंड यांनी वारंवार विनंती करूनही आरोपी अॅड. सागर कडू यांनी पैसे घेतलेल्या जागेचा नोंदणीकृत दस्त करून दिला नाही. त्याचप्रमाणे जागेचा ताबाही फिर्यादीस न देता व्यवहार पूर्ण करण्यासाठी टाळाटाळ केली. म्हणून फिर्यादी गावंड यांच्यासह आठ जणांची 52 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक झाल्याबाबतची तक्रार उरण पोलीस ठाण्यात देण्यात आली. या प्रकरणी भादंवि 420 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उरण पंचायत समितीच्या सभापतिपदी विराजमान झालेले शेकापचे अॅड. सागर कडू यांच्याकडून फसवणूक झाल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कडू यांचे सभापतिपद अडचणीत आले असून, या फसवणूकप्रकरणी पोलीस निरीक्षक अतुल आहेर अधिक तपास करीत आहेत.