Breaking News

एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंग धनोआ

पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000 विमानांनी एअर स्ट्राइक करत जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर कारवाई केली. या कारवाईत 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हवाई दलाचे प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. 40 वर्षांच्या सेवेत धनोआ यांनी विविध विभागांची जबाबदारी कौशल्यपूर्वक सांभाळली आहे. या शूरवीराचा जन्म जन्म 7 सप्टेंबर 1957 रोजी पंजाबमध्ये झाला. बीरेंद्र सिंग धनोआ यांचे वडील एस. एस. धनोआ हे बिहार कॅडरचे आयएएस अधिकारी होते. बीरेंद्र सिंग यांचे आजोबा संत सिंग हे ब्रिटिश-इंडियन आर्मीत कॅप्टन होते. दुसर्‍या महायुद्धात जपानविरुद्धच्या लढाईत ते सहभागी झाले होते. हा वारसा बीरेंद्र सिंग यांनी पुढे नेला. धनोआ यांचे रांचीतील सेंट झेविअर्स शाळेत शिक्षण झाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, राष्ट्रीय भारतीय सैनिकी महाविद्यालय येथे शिक्षण घेऊन जून 1978 मध्ये ते हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून दाखल झाले. वेगवेगळ्या क्षमतेच्या लढाऊ विमानांच्या सारथ्यामुळे हवाई प्रशिक्षक म्हणून त्यांची खास ओळख झाली. हवाई दल उपप्रमुखपदी नियुक्ती होण्याआधी त्यांनी दक्षिण-पश्चिमी हवाई दलाच्या मुख्यालयाचे प्रमुख म्हणून काम पाहिले. देशातील आघाडीवरील हवाई तळाचे कमांडर, परदेशात भारतीय सैन्य प्रशिक्षण दलाचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. कारगिल युद्धातही धनोआ यांचा सहभाग होता. शिमला कराराचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन या युद्धात अवघड भौगोलिक परिस्थितीत भारतीय हवाई दलाने घुसखोरी करणार्‍या दहशतवाद्यांना हुसकावले होते. हवाई दलाने ‘सफेद सागर’ मोहिमेद्वारे भेदक मार्‍याने घुसखोरांना धडा शिकविला. या मोहिमेची जबाबदारी ज्या लढाऊ विमानांच्या तुकडीवर होती, तिचे नेतृत्व एअर मार्शल बीरेंद्र सिंग धनोआ यांनी केले होते. तमिळनाडूतील राष्ट्रीय संरक्षण सेवा अधिकारी महाविद्यालयात मुख्य प्रशिक्षक (हवाई दल), गुप्तचर विभागाचे साहाय्यक प्रमुख, आघाडीवरील दोन तळांवर वरिष्ठ अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. सेवा काळात उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध पदकांनी त्यांचा गौरव करण्यात आला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply