Breaking News

पुन्हा एकदा मोदी मॅजिक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या सार्‍या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे भारताच्या विरोधात आगपाखड केली असून अणुयुद्धाचा गर्भित इशारा देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर जगभरातील सारे महत्त्वाचे देश भारताच्या बाजूने अभे राहात असल्याचे स्पष्ट दिसू लागल्याने खान यांच्याकडून अशी प्रतिक्रिया येणे स्वाभाविकच आहे.

फ्रान्सच्या बिआरित्झ शहरात जी-7 परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. या भेटीच्या क्षणचित्रांमध्ये अवघ्या जगाला मोदीजी आणि ट्रम्प यांच्या परस्पर संवादातील मोकळेपणा आणि मैत्रीपूर्ण देहबोलीचे दर्शन घडले. उभयतांमधील या जिव्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जराही न कचरता मोदीजींनी हिंदीतून बोलत काश्मीर प्रश्न हा केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यानचा असल्याचे सुस्पष्ट प्रतिपादन केले. आपसातील प्रश्न भारत आणि पाकिस्तान चर्चा करून सोडवू शकतात. त्यासाठी अन्य तिसर्‍या देशाला तसदी देण्याची आमची इच्छा नाही असेही मोदींनी स्पष्ट केले. एकीकडे मोदींनी ट्रम्प यांच्या उपस्थितीत काश्मीर प्रश्नी त्रयस्थ देशाची मध्यस्थी फेटाळून लावली तर दुसरीकडे ट्रम्प यांनीही आपल्या आधीच्या वादग्रस्त विधानांपासून फारकत घेत, भारत आणि पाकिस्तानने हा प्रश्न स्वत:च सोडवावा असे आपले मत असल्याचे मोदींच्या समक्ष पत्रकारांना सांगितले. मोदींच्या मुत्सद्देगिरीच्या या जादूने अवघा देशच काय, जगभरातील नेतेही अवाक झाले असतील. काश्मीरातील स्थिती भारताच्या नियंत्रणाखाली असल्याचे मोदी यांनी आपल्याला सांगितले. मोदी आणि खान स्वत:च चर्चेतून हा प्रश्न सोडवतील असे विधान ट्रम्प यांनी केले. मोदीजी येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अमेरिकाभेटीस जाणार आहेत. यादरम्यान भारत-अमेरिका द्विपक्षीय चर्चाही होईल तसेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही मोदी बोलणार आहेत. खेरीज अमेरिकेतील अनिवासी भारतीयांसमोर ह्यूस्टन येथेही मोदी बोलणार आहेत. या आगामी घडामोडींच्या आधी पार पडलेल्या जी-7 परिषदेत ट्रम्प आणि मोदी यांच्या दरम्यान जे काही घडले, ते सप्टेंबरमधील मोदींच्या अमेरिकाभेटीसाठी अत्यंत अनुकूल असे असून दोन्ही राष्ट्रांतील संबंधांवर दूरगामी प्रभाव टाकणारे आहे. नुकत्याच पार पडलेल्या जी-7 परिषदेमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन व्हाइट हाऊसकडूनही सोमवारी करण्यात आले. गेल्या महिन्याभरात ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर काही खळबळजनक विधाने केली होती. परंतु आता मात्र त्यांनी मोदींच्या भूमिकेला सुस्पष्ट पाठिंबा दिला आहे. इतकेच नव्हे तर अफगाणिस्तानातील परिस्थिती सावरण्याच्या कामी भारताची मोलाची मदत होत असल्याचे देखील ट्रम्प यांनी नमूद केले आहे. अर्थात ट्रम्प यांची वर्तणूक सातत्याने बेभरवशाची राहिली आहे. त्यामुळे ही जवळीक किती काळ टिकून राहते हे येत्या काळातच स्पष्ट होईल. भारताने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यापासून इम्रान खान यांनी अभय देशांमध्ये अणुयुद्धाची शक्यता वर्तवणे सुरूच ठेवले आहे. अणुयुद्ध अद्भवू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय समुदायाची आहे असे म्हणत ते अन्य बलाढ्य राष्ट्रांना यात नाक खुपसण्यासाठी उद्युक्त करीत आहेत. मात्र यात बरेच काही काश्मीरमधील परिस्थितीवरही अवलंबून आहे. तिथली कायदा व सुव्यवस्था परिस्थिती, येत्या वर्षी असणारी अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक यांचाही संबंधित समीकरणांवर प्रभाव पडणार आहेच.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply