Breaking News

अनिवासी भारतीयांशी विवाह करताना ‘सावधान’

पंजाबमध्ये जुलैमध्ये अनिवासी भारतीय विवाह आणि त्यातील समस्या या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.  परदेशात राहणारा नवरा मिळणं ही खास आनंदाची व प्रतिष्ठेची बाब समजली जात असल्याने परदेशातली नोकरी आणि तिथल्या उच्चभ्रू जीवनशैलीची भुरळ पडूनच परदेशस्थ मुलाला लगेच होकार दिला जातो. घाईगडबडीने लग्न केले जाते. या वेळी विवाहापूर्वी मुलाची पुरेशी चौकशी व विवाहांची कायदेशीर नोंदणीही अनेकदा केली जात नसल्याचे लक्षात आले. अशा वेळी फसवणूक झाल्यास मुलीसह कुटुंबालाच मोठा फटका बसत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली.  

या चर्चासत्रात एनआरआय व्यक्तीसोबत लग्न करून फसवलेल्या काही महिलांचीही उपस्थिती होती. राजविन्दर कौर या आपल्या मुलीचे लग्न कुलविंदरसिंगने मेलबर्नमध्ये राहणार्‍या मुलासोबत 2015मध्ये करून दिले होते. तो मुलगा मेलबर्नच्या कसिनोमध्ये मॅनेजर आहे. लग्नात मुलाने आणि त्याच्या घरच्यांनी सांगितलेल्या सर्व मागण्या त्यांनी पूर्ण केल्या होत्या. मुलीच्या लग्नात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कुलविंदरने आपल्या आजारी पत्नीच्या उपचाराकडे दुर्लक्ष केलं होतं. लग्न झालं. लग्नानंतर काही दिवस राजविंदर पतीसोबत मेलबर्नला राहिली. तिथे गेल्यावर सुरुवातीचे काहीच दिवस बरे होते. नवर्‍याचं रात्री उशिरा घरी येणं, कधी कधी घरीही न येणं, काही विचारलं तर मारहाण करणं हे सगळं सहन करत राजविंदर तिथे राहत होती. लग्नात तिला दिलेले सगळे दागिने, तिच्या नावे असलेला पैसा आणि तिचा पासपोर्ट नवर्‍याने त्याच्या ताब्यात ठेवला होता. तिला मायदेशी आईवडिलांना फोन करण्याचीही परवानगी नव्हती. त्यांचा फोन आला तर तिचा नवरा मी ऑफिसला आहे, असे सांगून त्यांच्याशी बोलणे टाळत असे. या परिस्थितीत राजविंदर राहत होती. घरातून बाहेर जाण्याची काही सोय नव्हती. कारण बाहेर जाताना नवरा घराला कुलूप लावून जात असे. त्यामुळे मेलबर्नमध्ये तिच्या खोलीशिवाय आणि नवरा घरी आल्यावर स्वयंपाकघराशिवाय अन्य कोणतेच ठिकाण तिला माहीत नव्हते. शिवाय नवर्‍याकडून होणारी मारहाण, शारीरिक शोषण याला अंतच नव्हता.

एक दिवस तिच्या वडिलांनी फोन करून तिच्या आईला कॅन्सर झाला आहे ही गोष्ट जावयाला सांगितली. राजविंदरला घेऊन तुम्ही भारतात परत या, असे सुचवले. त्यासाठी त्यांनी तिकिटाचे पैसेही पाठवले. त्याप्रमाणे राजविंदर नवर्‍यासोबत घरी पोहोचली. आईला भेटली. यानंतर तिच्या नवर्‍याने एक-दोन नव्हे तर तीन वेळा पंजाबमधील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये तिचे मेडिकल चेकअप करून घेतले. तिला कॅन्सर झाला आहे का, आईकडून या आजाराची लागण तिला झाली आहे का, हे पाहण्यासाठी. हे सगळं करूनही त्याच्याकडून होणारा त्रास कमी होईल याची काही शाश्वती नाही. शेवटी एक दिवस तिला आणि तिच्या घरच्यांना काही न सांगता तो मेलबर्नला निघून गेला. या काळात तिच्या आईचे निधन झाले.

जालंधरमध्ये राहणारी सरिता. वय 28च्या जवळपास. 2013मध्ये अमेरिकेत राहणार्‍या मुलासोबत लग्न झाले. सरिताचा पासपोर्ट आणि व्हिसा आल्यानंतर तिला घेऊन जाईन, असे सांगून लग्न झाल्यावर एकाच आठवड्यात नवरा अमेरिकेला निघून गेला. सरिता सासरी सासू-सासर्‍यांसोबत राहू लागली. लग्नात घर घेऊन देण्याची बोलणी झाली होती. त्याप्रमाणे सरिताच्या वडिलांनी दोन वर्षांत घर घेऊन दिले होते. घराची नोंदणी करण्यासाठी सासू-सासर्‍यांनी घर मुलाच्या नावावर केले पाहिजे ही अट घातली. मुलीच्या वडिलांनीही कोणताही विचार न करता अट मान्य केली. या दोन वर्षांच्या काळात सरिताचा पासपोर्ट बनला होता. व्हिसा मिळण्यासाठी कोणतीही प्रक्रिया सुरू केली नव्हती. घराच्या नोंदणीसाठी आल्यावर आपण व्हिसासाठी अर्ज करू, असे तिला सांगण्यात आले. ठरल्याप्रमाणे मुलगा आला, नोंदणी झाली. पुढच्या चारच दिवसांत त्याने तिला घरस्फोटाची नोटीस पाठवली आणि घर सोडून जाण्यास सांगितले.

राजविंदर आणि सरिता यांनी फसवणुकीबद्दल शांत न बसता आवाज उठवला. राजविंदरने तिची तक्रार पंजाब राज्य महिला आयोगाकडे केली आहे, तर सरिताने ज्या दिवशी तिला घटस्फोटाची नोटीस मिळाली त्या दिवशी स्थानिक पोलीस स्टेशनला पतीविरुद्ध लग्नातील फसवेगिरीचा गुन्हा नोंदवला. सोबतच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याचा उपयोग करून त्याच घरात राहण्याचे आदेश कोर्टाकडून मिळवले. यावर सरिताच्या नवर्‍याने आणि सासरच्या लोकांनी तिला आठ लाख रुपये घेऊन घटस्फोट आणि घर सोडून जाण्याची मागणी केली आहे. सरिता मात्र हे घर तिच्या वडिलांनी घेऊन दिले आहे. त्यामुळे तिच्या नावावर व्हावे यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. दरम्यानच्या काळात तिचा नवरा अमेरिकेला निघून गेला. राजविंदरला पुढे तिच्या आईसारखा कॅन्सर होईल त्यामुळे काही झाले तरी मी तिला पत्नी म्हणून स्वीकार करणार नाही, असे तिच्या नवर्‍याने सांगितले आहे.

38 वर्षीय सावित्रीला तिच्या पतीने लग्न झाल्यावर युक्रेनला घेऊन जाईन असे सांगितले होते. आजपर्यंत त्याने कधीही तिला सोबत नेले नाही. दोन-तीन वर्षांतून एकदा आल्यावर आठवडाभर नवरा सोबत राहत असे. यातून एक मूल जन्माला आले आहे. त्या मुलाचे संगोपन करणे कठीण आहे. समाजासाठी मी नवर्‍याने सोडलेली स्त्री बनून राहिली आहे. माझे वडील लष्करात होते. भाऊ भारत-चीन सीमेवर आहे. त्याच्यासाठी अजून किती दिवस मी जबाबदारी म्हणून राहायचं, हा प्रश्न तिच्यापुढे आहे. सावित्रीने मुलाच्या संगोपनाची जबाबदारी पतीने घ्यावी यासाठी कायदेशीर लढाई सुरू केली आहे.

राजविंदर, सरिता आणि सावित्री या तिघी अनिवासी भारतीय व्यक्तीसोबत लग्न करून फसलेल्या स्त्रिया आहेत. लग्नानंतर विवाह नोंदणी अनिवार्य केली आहे, परंतु बहुतांश लोक त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. सरिताचे वडील लग्नात झालेल्या फसवणुकीसाठी स्वत:ला दोषी मानतात. सगळी चौकशी केली होती, कुठे शंका घ्यायला जागा नव्हती. त्यामुळे हे लग्न झाले. आम्ही लग्नात फसवले गेलो असलो तरी आम्ही हरलो नाही. आमचे कुटुंबीय आमच्यासोबत आमची ताकद आणि आवाज बनून उभे आहेत. राजविंदरचे वडील सांगतात, माझी पत्नी तर गेली. जे गेले ते परत येऊ शकत नाही. हे दु:ख पचवून मी मुलीसाठी तिच्या बाजूने प्रत्येक वेळी उभा राहणार आहे. सरिताने पूर्णपणे कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेऊन आपला हक्क मिळविण्यासाठी काम सुरू केले आहे, तर सावित्रीने पतीच्या संपत्तीमध्ये मुलाचा वारसा लागावा म्हणून कोर्टात प्रकरण दाखल केले आहे. या तिघींचे म्हणणे आहे की, आपल्या न्याय यंत्रणेकडून आम्हाला निकाल मिळण्यासाठी उशीर होऊ शकतो. असे असले तरी आम्ही कायदेशीर लढाई सुरूच ठेवू. सोबतच आम्ही आमच्यासारख्या फसवल्या गेलेल्या सर्वांना एकत्र आणण्याचे कामही करीत आहोत. आमच्या स्तरावर आम्हाला जिथे शक्य होईल तिथे तिथे आम्ही अनिवासी भारतीय मुलासोबत लग्न जुळवताना कोणती खबरदारी घ्यावी, त्याचा व्हिसा कोणता आहे, त्याचे आधीचे लग्न झालेले आहे का, त्याच्या नोकरीचे स्टेटस काय आहे, त्याचं परदेशातील वास्तव्य, त्याची कागदपत्रे या सगळ्याची माहिती घेऊनच पुढचा निर्णय घ्यावा, असे प्रबोधन करीत आहोत. आमच्या बाबतीत आम्ही मुलाची परदेशातील कोणतीही बाजू तपासली नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फसगत झाली आहे. हे इतर मुलींच्या बाबतीत होऊ नये यासाठीही आम्ही जमेल तिथे संवाद करत असतो.

भारतात गेल्या पाच वर्षांपासून पंजाब, केरळ, गुजरात आणि महाराष्ट्रात अनिवासी भारतीय मुलासोबत लग्नाचं प्रमाण आणि तक्रारींचंही वाढत आहे. 2014मध्ये 425, 2015मध्ये 422, 2016मध्ये 486 आणि  2018मध्ये 516  खटले नोंदविले गेले आहेत. राजविंदरच्या बाबतीत तिच्या नवर्‍याने भारतीय कोर्टात हजर व्हावे यासाठीचे कोर्टाचे आदेश निघाले आहेत. सरिता सासरीच ठामपणे राहत आहे. सावित्रीने पतीच्या संपत्तीचे दस्तावेज जमा करण्याचे काम सुरू केले आहे. तिघींसाठी कायदा आहे, मदत आहे असे दृश्यमान चित्र असले तरी पितृसत्ताक मूल्यावर आधारित समाजात ही कायदेशीर लढाई साधीसोपी नक्कीच नाही.

-नितीन देशमुख

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply