भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत या झटपट प्रकारातील चषकावर दुसर्यांदा आपले नाव कोरले. चातक पक्षी जसा पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो, तसा प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी आपला संघ जगज्जेता होण्याची आसुसतेने प्रतीक्षा करीत होता. तो क्षण दशकभरानंतर येऊन जल्लोष करण्याची पर्वणी साध्य झाली…
भलेही इंग्लंड क्रिकेटचा जनक असेल आणि ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक चषक जिंकले असतील, पण या खेळाला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता भारताने मिळवून दिली हे कुणीही, अगदी कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानदेखील नाकारू शकत नाही. भारत हा विविध जाती-धर्मांनी बनलेला देश म्हणून ओळखला जातो. इथे अस्मितेची जोरदार स्पर्धा दिसून येते, पण विषय जेव्हा क्रिकेटचा असतो तेव्हा कोट्यवधी भारतीय आपण एकाच देशाचे नागरिक आहोत या भावनेने तिरंगी ध्वजाखाली एकवटतात. आताही तेच चित्र पहावयास मिळाले. विश्वचषक जिंकल्यानंतर देशात ऐन पावसाळ्यात दिवाळी साजरी झाली. यावरून क्रिकेटवेड्या भारताचे या खेळावरील प्रेम ठळकपणे अधोरेखित होते.
खरंतर गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक बड्या क्रिकेट स्पर्धांमध्ये भारतीय संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिलेली आहे. भारताने शेवटच्या वेळी 2011मध्ये विश्वचषक जिंकला होता, तो एकदिवसीय स्वरूपातील होता. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली ’निळ्या आर्मी’ने हा चषक जिंकून महान फलंदाज सचिन तेंडुलकरला समर्पित केला होता. दोन वर्षांनंतर भारताने धोनीच्याच कर्णधारपदाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी ही आणखी एक स्पर्धा जिंकली, मात्र त्यानंतर भारतीय चाहत्यांना पुढील आयसीसी विजेतेपदासाठी 11 वर्ष वाट पहावी लागली. या दरम्यान काही संधी प्राप्त झाल्या, पण दुर्दैवाने त्याचे यशात रूपांतर करता आले नाही.
2014 साली टी-20 विश्वचषक, 2017मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, 2021च्या पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाच्या जवळ जाऊन यशाने आपल्याला हुलकावणी दिली. गतवर्षी तर जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि एकदिवसीय प्रकारातील विश्वचषक अशा दोन मोठ्या स्पर्धांचे विजेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने भारताला अंतिमतः हरवून जिंकले. यापैकी सगळे सामने जिंकून शेवटी वर्ल्डकप फायनलमध्ये झालेला पराभव जिव्हारी लागला होता.
ज्या रोहित शर्मा, विराट कोहली यांनी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुलीनंतर भारतीय क्रिकेटची धुरा समर्थपणे सांभाळली, त्यांच्या पदरी निर्णायक क्षणी येणारी निराशा वेदनादायी ठरत होती. अखेर हे दुष्टचक्र भेदण्यात त्यांना यश आले आणि 140 कोटी देशवासीय सुखावले.
अंतिम लढाईदेखील सोपी नव्हती. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांना मात देऊन अंतिम फेरीत दाखल झालेल्या भारतीय संघासमोर आव्हान होते ते पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केलेल्या दक्षिण आफ्रिकेचे. या महत्त्वपूर्ण सामन्यात अलिकडे धावांसाठी चाचपडत असणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सूर गवसला, जे त्याच्यासह संघासाठी आवश्यकच होते, कारण धडाकेबाज रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर रिषभ पंत आल्यापावली हजेरी लावून परतला होता. अशा वेळी एकाने खेळपट्टीवर तग धरून उभे राहणे नितांत गरजेचे होते. विराटला अक्षर पटेलची उत्तम साथ लाभली. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर दबाव निर्माण होऊन धावगती मंदावली होती. ही कोंडी अक्षरेने सुरुवातीला एकेरी, दुहेरी धावा घेत आणि प्रसंगी मोठे फटके मारून फोडली. दिलेली जबाबदारी पूर्ण करून अक्षर परतल्यानंतर शिवम दुबेनेही निवड सार्थ करीत उपयुक्त खेळी केली. या दरम्यान विराटने अर्धशतक पूर्ण केले व त्यानंतर तो बाद झाला. विराट-शिवम जोडीने शेवटच्या षटकांमध्ये सातत्यपूर्ण फटकेबाजी केली असती, तर संघाच्या आणखी 15-20 धावा अधिक होऊ शकल्या असत्या, पण अखेर 176 धावा फलकावर लागल्या. हे लक्ष्य ना एकदम मोठे होते, ना माफक, पण आव्हानात्मक जरूर होते.
पावणेदोनशे धावांचा पाठलाग करताना द. आफ्रिकेची सुरुवातही खराबच झाली. सलामीचा फलंदाज रिझा हेंड्रिक्स हा जसप्रीत बुमराहचा शिकार ठरला. बुमराहच्या भन्नाट इनस्विंग चेंडूवर हेंड्रिक्सची दांडी गुल झाली, तर त्यानंतर आलेल्या कर्णधार एडन मारक्रमला अर्शदीप सिंगने पंतकरवी झेलबाद केले. आता आफ्रिकेचा डाव गडगडणार असे वाटत असताना दुसरा सलामीवीर क्लिंटन डी कॉकने एक बाजू लावून धरली. दुसरीकडे युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्जने आक्रमक पवित्रा घेतला. या दोघांनी दमदार अर्धशतकी भागिदारी केली, मात्र फटकेबाजीच्या प्रयत्नात दोघेही बाद झाले. दरम्यान, आयपीएल गाजवणारा हेन्रीच क्लासेन मैदानावर आला. त्याच्या जोडीला आणखी एक धोकादायक फलंदाज डेव्हिड मिलर होता. क्लासेन-मिलरच्या झंझावातामुळे सामना आफ्रिकेच्या बाजूने झुकला होता. त्यामुळे ही फायनलसुद्धा गमावून भारताचा पुन्हा स्वप्नभंग होण्याची स्थिती निर्माण झाली. अशा बिकट प्रसंगी बुमराह संघाच्या मदतीला धावून आला. अष्टपैलू हार्दिक पांड्यानेही गोलंदाजीत चमक दाखवत अर्धशतकवीर क्लासेनला बाद केले. इथून भारताच्या आशा पल्लवित झाल्या. शेवटच्या षटकात मिलरचा सीमारेषेवर सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल टिपला. हा केवळ झेल नव्हता, तर सूर्याने भारताला वर्ल्डकपच उंचावून दिला होता.
भारताने सर्वप्रथम कपिल देवच्या नेतृत्वाखाली 1983मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी कर्णधार असताना 2007मध्ये पहिलावहिला टी-20 वर्ल्डकप पटकावला. चार वर्षांतच पुन्हा एकदा धोनीच्या नेतृत्वात 2011 साली वनडे वर्ल्डकपला गवसणी घातली, तर आता दुसर्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकण्याची किमया रोहित शर्माच्या कारकिर्दीत भारताने साधली आहे. गेल्या वर्षी मायदेशी अधुरे राहिलेले स्वप्न ‘रोहितसेने’ने सांघिक कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजमध्ये पूर्ण केले आणि भारतीयांना आनंदोत्सव साजरा करण्याची संधी दिली. यासाठी भारतीय संघाचे कौतुक झालेच पाहिजे.
-समाधान पाटील, पनवेल
Check Also
पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
मालमत्ता करावरील शास्ती माफ -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त फोरम, फेडरेशन यांच्या दिशाभूलीमुळे …