Breaking News

लॉकडाऊनमध्ये व्यापार्‍यांकडून ग्राहकांची लूट; जीवनावश्यक वस्तूंच्या

दरात दुपटीने वाढ

मुरूड ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात 26 जुलैपर्यंत लॉकडाऊनचे निर्देश देण्यात आले आहेत.  याचा गैरफायदा घेत काही किराणा व्यापारी व भाजी विक्रेत्यांनी आपले उखळ पांढरे करून घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामी दोन-चार दिवसांतच भाज्यांचे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर दुपटीने वाढल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.

26 जुलैपर्यंत रायगड जिल्हा कडक बंद असल्याची घोषणा होताच शहरातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. नेमकी हीच बाब हेरून पुरवठा कमी असल्याचे कारण देत भाजीपाला विक्रेत्यांनी भाज्यांचे दर दुपटीने वाढविले आहेत. किराणा सामानाचीही अशीच अवस्था असून काही सामानांच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे अगोदरच जनतेत संभ्रमाचे वातावरण असताना अचानकपणे वाढलेल्या वस्तूंच्या दरामुळे जनता पुरती धास्तावली आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा सुरळीत पुरवठा होत आहे. कोणी साठेबाजी करून वाढीव दराने विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे तहसीलदार गमन गावित यांनी सांगितले. तहसीलदारांनी कार्यालयात न बसता बाजारपेठेत फिरून सदर परिस्थितीचे अवलोकन करावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे मुरूड तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने होत्याचे नव्हते झाले आहे. आता सगळे सुरळीत होईल आणि आपले व्यवसाय पूर्ववत होऊन  बँकांचे हप्ते, वीज बिल, घरभाडे, दुकान भाडे तसेच इतर खर्च भागवता येईल या आशेत असतानाच पुन्हा लॉकडाऊनमुळे सामान्य माणूस अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. लॉकडाऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आहे की व्यापार्‍यांचा फायदा करण्यासाठी, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply