खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त
संस्कार भारतीच्या पनवेल व नवीन पनवेल शाखेच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीचा कार्यक्रम नुकताच पनवेलजवळील चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेच्या मुलांसोबत साजरा करण्यात आला. या वेळी आश्रमशाळेतील मुलांनी दहीहंडी फोडली, तसेच वैयक्तिक व सामूहिक गाणी म्हणून उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यकर्त्यांनीही विविध खेळ व गाणी म्हणून मुलांना प्रतिसाद दिला.
आश्रमशाळेचे व्यवस्थापक संदीप शिंदे हे नंदुरबार येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेचे माजी विद्यार्थी असून, उच्चशिक्षित आहेत. व्यवसायाची काही वर्षे सोडून ते आश्रमशाळेसाठी आपला पूर्ण वेळ देत आहेत. त्यांनी या वेळी मुलांची दैनंदिनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितली. अल्पोपहारानंतर कार्यकर्त्यांमध्ये विविध विचारांची देवाण-घेवाण होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास संस्कार भारतीच्या वतीने सुनीता खरे, रोहिणी टिळक, नम्रता धनावडे, अपर्णा व स्वाती नाडगौंडी, दिपाली केळकर, माधुरी आंबेकर, विद्या रानडे, वैशाली कुलकर्णी, मेघा वैशंपायन, अस्मिता गोखले, शीतल हजारे, मानसी पाटणकर, वर्षा मेहेंदर्गे, स्वाती सुभेदार, स्नेहा कुलकर्णी, निलिमा देशपांडे, सिद्धेश झारे आदी उपस्थित होते.
वनवासी कल्याण आश्रमशाळेत अनेक संस्कारक्षम उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून आपण नवीन पिढी उत्तम प्रकारे घडवू शकतो, असा ठाम विश्वास आम्हाला आहे.
-संदीप शिंदे, आश्रमशाळा व्यवस्थापक