देहू, पैठण ः प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि पैठणमधून संत एकनाथ महाराज यांच्या पालख्यांचे गुरुवारी (दि. 1) प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान झाले. गेल्या वर्षीपासून कोरोना महामारी कायम असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा झाला, तर आळंदी येथून शुक्रवारी ज्ञानोबा माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे.
यंदाही आषाढी एकादशीच्या सोहळ्यावर कोरोनाचे सावट असल्याने फक्त मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी संत तुकाराम महाराज यांचा 336वा पालखी सोहळा गुरुवारी पार पडला. देहू नगरी दरवर्षी ग्यानबा-तुकारामच्या गजराने दुमदुमून जात असते, मात्र कोरोनाचे संकट अद्यापही असल्याने प्रस्थान यंदाही साधेपणात झाले. संत एकनाथ महाराजांच्या पैठणमध्येही असेच चित्र होते. तेथेही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पालखीने प्रस्थान ठेवले.
दोन्ही पालख्यांनी प्रदक्षिणा घातल्यानंतर महाराजांच्या पादुका मुख्य मंदिरात विसावल्या. यानंतर त्या 19 जुलै रोजी एसटी बसमधून पंढरपूरला रवाना होणार आहेत.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …