Breaking News

गणेशोत्सव कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून साजरा करा -तानवडे

मोहोपाडा : वार्ताहर

गणेशोत्सव आनंदात साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेवे भान ठेवा, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याच्या सभागृहात खालापूर तालुक्याचे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी केले. या वेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य व डीजे चालकांसह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

गणेशोत्सव हा कोकणातील अत्यंत लोकप्रिय सण आहे. गणेशोत्सवात समाजप्रबोधनाबरोबरच प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यावर भर द्या, असे आवाहन करत उत्सवादरम्यान कोणकोणती खबरदारी घ्यावी याबाबत विस्तृत मार्गदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे व डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांनी केले.

या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे म्हणाल्या की, गणपती सणात सर्रास पत्यांचे जुगार खेळले जाऊ नयेत. डीजे व डॉल्बीला बंदी असल्याने उच्च न्यायालयाने दिलेल्या नियम व कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे. सण व उत्सवात कोणतीही अडचण व समस्या असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. वाहतुकीला अडथळा होईल असे मंडप करू नयेत. डेकोरेशन पाहायला गर्दी होते; त्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी. सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपला रजिस्ट्रेशन अर्ज ऑनलाईन भरावा, तसेच मिरवणुकीत गुलालाचा वापर न करता फुलांचा वापर करावा, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

या वेळी खालापूर तालुक्याचे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील म्हणाले की, रीतसर वीज कनेक्शनचा वापर करावा. मिरवणुकीत डीजे मिक्सरचा वापर आढळल्यास कारवाई करण्यात येईल. निसर्गाची हानी होईल असे वर्तन करू नये. आरास देखावे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणारे अथवा विटंबना करणारे नसावेत. राष्ट्रप्रेम, बंधुभाव, प्रेम आणि माणुसकीचा संदेश देणारे असावेत. या वेळी गोपनीय खात्याचे अमोल पवार, गणेश मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटी पदाधिकारी, डीजेचालक, परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply