सरपंचपदी भारती चितले; तर उपसरपंचपदी मुकेश पाटील
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त – कराडे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मुरकुटे यांच्या अथक परिश्रमाने भाजपने बाजी मारली असून ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदी भारती हेमंत चितले या निवडून आल्या आहेत. उपसरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात होऊन उपसरपंचपदी भाजपचेच मुकेश परशुराम मुरकुटे विजयी झाल्याने कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले आहे.
कराडे खुर्द ग्रामपंचायत उपसरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात झाली. यावेळी भाजपच्या वतीने उपसरपंचपदासाठी मुकेश परशुराम पाटील यांनी अर्ज दाखल केला, तर शेकाप आघाडीच्या वतीने माधुरी प्रशांत चितले यांनी अर्ज दाखल केला होता. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भारती चितले, ग्रामसेवक धारणे व पंचायत समिती अधिकारी उपस्थित होते. दोन्ही अर्जांची छाननी होऊन मतदान प्रक्रिया झाली. यात भाजपच्या मुकेश पाटील यांना सहा; तर आघाडीच्या माधुरी चितले यांना चार मते मिळताच निवडणूक अधिकार्यांनी कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मुकेश पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला.
भाजपच्या पदाधिकार्यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढली. गारमाता देवीचे दर्शन घेऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. कासप गावात मिरवणूक येताच ठिकठिकाणी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक चांवढोली येथील भवानी देवीचे दर्शन घेऊन गावातून भारती चितले यांच्या घरापर्यंत काढण्यात आली. यावेळी भाजपच्या उमेदवारांना कराडे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवून देणार्या मतदारांचे माजी सरपंच विजय मुरकुटे यांनी आशीर्वाद घेतले. भाजप विभागप्रमुख किरण माली यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.