Breaking News

उनाड गुरे ही अलिबागमधील एक जटील समस्या

निसर्गसौंदर्याने नटलेल्या अलिबागमध्ये येणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. स्वच्छ समुद्रकिनारा हे पर्यटकांचे आकर्षण आहे. मिनी गोवा म्हणून हे शहर उदयास येत आहे. मुंबई शहरापासून जवळ असल्यामुळे हजारो पर्यटक या शहरात येतात. या पर्यटकांना भेडवसावणारी एक समस्या आहे ती म्हणजे शहरात फिरणारी उनाड गुरे व घोडे. या उनाड गुरांमुळे अनेक अपघात घडले आहेत. अलिबागकरांनादेखील याचा त्रास होत आहे. उनाड गुरे अलिबागमधील एक जटील समस्या बनली आहे, परंतु याकडे नगरपालिका फार गांभीर्याने पाहत नाही.

अलिबाग शहर आणि परिसरात उनाड गुरांचा वाढता मुक्त संचार हा अपघातास निमित्त ठरणारा आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढला आहे. अलिबाग शहर, रेवदंडा रोड, रेवस आदी मार्गांवर ही उनाड गुरे मुक्त संचार करीत आहेत. अलिबाग एसटी आगारामध्येदेखील या गुरांचा मुक्त संचार असतो. कळपाने रस्त्यात उभी राहणारी ही गुरे कधी कधी ठाण मांडून बसतात आणि त्या वेळी वाहतुकीला मोठी अडचण होते. या उनाड गुरांचा हा संचार अनेकदा अपघातांस कारणीभूत ठरत आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरात उधळलेल्या घोड्यांमुळे दुचाकीवरून जाणार्‍या दोघांना मोठा अपघात झाला. या गुरांचा मुक्त संचार शहर आणि परिसरात होत असतो. या गुरांपैकी काही गुरांचे मालक असल्याचे सांगण्यात येते. पूर्वी अलिबागेत गुरांसाठी कोंडवाडा होता. आता कोंडवाडा नसल्याने शहरात या गुरांचा उपद्रव वाढला आहे. बर्‍याचदा ही गुरे रस्त्यात ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच शिवाय ही गुरे गर्दीच्या वेळी उधळल्यास मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुले, विद्यार्थी, वृद्ध, पादचारी यांना या उनाड गुरांमुळे धोका असल्याने त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार केली जाते, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कोंडवाडा नसल्याचे कारण सांगितले जाते, परंतु किमान कारवाई तरी केली पाहिजे. या गुरांचे मालक शोधून त्यांना किमान समज तरी द्यायला हवी, पण तेही होत नाही.

अलिबागला आल्यावर समुद्रकिनार्‍यावर जाऊन घोडागाडीत बसून समुद्रकिनार्‍याची सफर करण्याचा आनंद पर्यटक घेतात. त्यामुळे अलिबागमधील टांगा व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. यामुळे स्थानिकांना चांगला रोजगारही उपलब्ध झाला, परंतु त्यासोबत काही समस्याही निर्माण झाल्या. समुद्रावर पडणार्‍या घोड्यांच्या लिदीमुळे नागरिकांच्या व पर्यटकांच्या आरोग्याची समस्या उभी राहिली. घोड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. समुद्राला भरती आल्यानंतर घोडे मोकाट सोडून दिले जातात. शहरात फिरणार्‍या उनाड घोड्यांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.

समुद्राला भरती आल्यानंतर घोडे मोकाट सोडून दिले जातात. त्यामुळे शहारात उनाड घोड्यांची समस्या निर्माण झाली. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या. याची दखल घेऊन स्व. नमिता नाईक नगराध्यक्ष असताना या उनाड घोड्यांना लगाम घालण्याचा निर्णय अलिबाग नगर परिषदेने घेतला होता. शहरातील मोकाट घोड्यांची समस्या लक्षात घेऊन अलिबाग नगर परिषदेतर्फे शहरातील सर्व घोड्यांना नगर परिषदेतर्फे पट्टा द्यायचा. त्यावर नगर परिषदेचा नोंदणी क्रमांक असेल. नगर परिषदेच्या नोंदणी पुस्तकात घोड्याचे छायाचित्र, त्याची ओळख दर्शविणारी खूण आणि मालकाचा नाव-पत्ता याची नोंद असेल. एखादा घोडा मोकाट सापडला तर तो लगेच त्याच्या मालकाकडे सुपूर्द करायचा. या उपक्रमाकरिता खास निधीची तरतूद करण्यात आली होती. हा एक चांगला निर्णय अलिबाग नगर परिषदेने घेतला होता, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही.

गुरे व घोडे पाळणारे या जनावरांचा उपयोग करून पैसे कमावतात, परंतु त्यांची निगा मात्र राखत नाहीत. एखादी गाय व्यायली की तिला घरी आणायचे. दूध काढायचे आणि नंतर तिला पुन्हा सोडून द्यायचे अशी मानसिकता आहे. घोड्यांच्या बाबतीतदेखील तसेच आहे. अलिबाग एक पर्यटनस्थळ आहे. लाखो पर्यटक या शहरात दरवर्षी येतात. त्यांना या मोकाट जनावरांचा त्रास सहन करावा लागतो. अपघात होतात. त्यामुळे या शहराची बदनामी होते. अलिबाग नगर परिषदेने याबाबत आता कठोर निर्णय घेतला पाहिजे. जनावरांचे मालक काही प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांचे सत्ताधार्‍यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे या उनाड गुरे व घोड्यांवर कारवाई केली जात नाही. असे असेल तर फारच वाईट आहे. नागरिकांच्या हितासाठी सत्ताधार्‍यांना काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. आपल्या शहराची बदनामी थांबवण्यासाठी उनाड गुरे व घोड्यांचा बंदोबस्त करायलाच हवा. त्यासाठी अलिबाग नगर परिषदेने आता थोडे कठोर व्हायला हवे. सारे काही करता येईल फक्त सत्ताधार्‍यांची इच्छाशक्ती हवी.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply