आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल एसटी बसस्थानकात प्रवेश केल्यावर प्रवाशांना समाधान वाटले पाहिजे यासाठी माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवासी वाहतूक सामाजिक संस्था चांगले कार्य करीत आहे. या कार्यात त्यांना माझे संपूर्ण सहकार्य राहील. पनवेल आगाराच्या बांधकामासाठी परिवहन सचिवांना पत्र देऊन नवीन ठेकेदार नेमण्याची मागणी केली असून त्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 17) येथे केले. स्वच्छता अभियानाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत पनवेल एसटी बसस्थानक चकाचक करण्यासाठी प्रवासी वाहतूक सामाजिक संस्थेने अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेऊन शनिवारी सकाळी आवारातील कचरा, गवत आणि झुडपे साफ केली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अॅड. भुजबळ, माजी नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे, संस्थेचे सदस्य डॉ. मनीष बेहरे, उपेंद्र मराठे, के. जी. म्हात्रे, अशोक आंबेकर, उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ, महापालिकेचे शैलेश गायकवाड, एसटी आगार प्रमुख सुजीत डोळस, स्थानक प्रमुख ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते.
बसस्थानकातून घाटमाथ्यावर जाणार्या गाड्या जिथे उभ्या राहतात तिथे फलाटाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत अनेक वेळा प्रवासी विधी करतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. म्हणूनच पूर्व बाजूला पुरुष व महिलांसाठी मोबाईल शौचालयाची महापालिकेतर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व स्वच्छतेचा संदेश देणार्या जाहिराती तेथील भिंतींवर रंगवण्यासाठी महापालिकेला पत्र देऊन मागणी करण्याची ठरले. पूर्व बाजूला छोटासा बगीचा केल्यास प्रवासी त्या ठिकाणी विधी करणार नाहीत, म्हणून तसा प्रस्ताव आमदार प्रशांत ठाकूर यांना सांगताच त्यांनी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना तेथे बगीचा करून देण्यास सांगितले.
परेश ठाकूर म्हणाले की, पनवेल स्थानकाच्या आवारात पूर्व बाजूला मोबाईल शौचालय ठेवल्यास प्रवाशांची सोय होईल व परिसरात दुर्गंधी होणार नाही. मोकळ्या जागेत बगीचा बनवण्याचा प्रस्तावही चांगला आहे. माझ्याकडे दोन संस्थांनी बगीचासाठी जागा देण्याची मागणी केली आहे. मी आजच त्यांना जागा दाखवून येथे बगीचा बनवण्यास सांगतो.