उरण : प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या वाढत्या प्रकोपामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईहून दोन दिवसांपूर्वी तीन बोटी घारापुरी बेटाजवळ समुद्रात आल्या आहेत. त्यामुळे बेटावर राहणार्या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजधानी मुंबई कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. मुंबईतील बहुतांश ठिकाणे कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मुंबईत लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमांची युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू असताना तेथील बंदरात गेल्या महिनाभरापासून नांगरून ठेवण्यात आलेल्या तीन खासगी लाँचेस मंगळवारी सायंकाळी घारापुरी बेटाजवळील शेतबंदर येथे अचानकपणे दाखल झाल्या आहेत. निलकमल, राम अयोध्या आणि अष्टविनायक अशी या तीन लाँचेसची नावे आहेत.
दरम्यान, मुंबई बंदर सोडताना आणि घारापुरी बेटावर दाखल होताना लाँचेसच्या मालकांनी मेरिटाइम बोर्डाची परवानगी घेणे आवश्यक होते, मात्र कोणत्याही प्रकारची माहिती न देता अथवा परवानगी न घेता बंदरात आलेल्या लाँचमालकांवर कारवाई करण्यात येईल, असे मुंबई मेरिटाइम व संबंधित विभागाचे बंदर निरीक्षक संजय पिंपळे यांनी सांगितले. मालकांना लाँचवरील कर्मचारी बंदरात उतरणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही ते म्हणाले, तर या गंभीर घटनेबाबत अधिक माहिती घेतली जात असल्याचे मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदिपान शिंदे यांनी सांगितले.