कर्जत : बातमीदार
आदिवासी दिनानिमित्त कर्जत तालुका आदिवासी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. 9) बाईक रॅली काढण्यात आली होती. नेरळ येथे सुरुवात झालेली ही आदिवासी रॅली कर्जत शहर मार्गे कशेळे येथे पोहचली. वाटेत सर्व ठिकाणी आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
कर्जत तालुक्यात ठाकूर-कातकरी आदिवासी संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. शुक्रवारी नेरळ येथील कोतवालवाडीमध्ये बाईक रॅलीला सुरुवात झाली, त्यानंतर नेरळ गावातून ही रॅली माथेरान रस्त्याने हुतात्मा चौकात पोहचली. तेथे हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्या वेळी हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने बाईक रॅलीचे स्वागत करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष भरत शिद, परशुराम दरवडा, मंगळ केवारी, बुधाजी हिंदोळा, सचिव मोतीराम पादिर, महिला अध्यक्ष रेवती ढोले, माजी अध्यक्ष जैतु पारधी, मालू निर्गुडे, जि.प. सदस्या अनसूया पादिर, कर्जत पं.स. सदस्या जयवंती हिंदोळा, माजी सरपंच दादा पादिर, जे. के. पिरकड आदी उपस्थित होते.
नेरळ येथून बाईक रॅली कर्जतमध्ये पोहचली. तेथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आदिवासी संघटनेच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार अविनाश कोष्टी, नायब तहसीलदार संजय भालेराव आणि निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन दिले. बाईक रॅलीच्या वतीने शिवपुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्या वेळी आदिवासी महिलांनी पारंपरिक नृत्ये सादर केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ही बाईक रॅली कडाव येथे पोहचली. कशेळे येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्यानंतर या बाईक रॅलीचा समारोप झाला.
अलिबागमध्ये मिरवणूक
अलिबाग : प्रतिनिधी
जागतिक आदिवासी दिन शुक्रवारी (दि. 9) रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. आलिबाग शहरात आदिवासींनी मिरवणूक काढली होती. पारंपरिक वेश परिधान केलेल्या महिला व पुरुष या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आदिवासी बांधवांसाठी भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
आदिवासी बांधवांनी आपली पारंपरिक हत्यारे घेऊन, तसेच काठ्यांवर चालून रॅलीत सहभाग घेतला होता. पारंपरिक वेशामधील आदिवासी बांधव पारंपरिक नृत्य करीत होते. महिला डोक्यात रान फुले घालून गाणी बोलत संगीतावर ठेका धरून नाचत होत्या.