खोपोली : प्रतिनिधी
अष्टविनायकापैकी मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या महड गावातील वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी खालापूर, चौक, खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी परिसरातील हजारो भक्तांनी गर्दी केली होती. अंगारक चतुर्थीनिमित्ताने कसळखंड येथील रोशन पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी सुंदर अशी मनमोहक रांगोळी काढली होती, तसेच गणेशभक्तांना दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी वाहनांची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. वरदविनायक म्हणजे इच्छापूर्ती करणारा गणपती अशी श्रद्धा असल्यामुळे मध्यरात्रीपासूनच त्याचे दर्शन घेण्यास सुरुवात झाली होती. अंगारक चतुर्थीनिमित्त कसळखंड येथील रोशन पाटील, पद्मिनी खाडे, अमृता केदार माळी, नम्रता गोंधळी, सुशील ग्राफिक्स, स्वप्नील गायकर, सागर ननवरे यांनी 10/20 फूट आकाराची गणरायाची सुरेख रांगोळी काढली होती. तिच्याकडे भक्तगणांचे मन आकर्षिले जात होते. ती रांगोळी आपल्या मोबाइलमध्ये टिपण्याचा ते प्रयत्न करीत होते.
ही गणरायाची रांगोळी काढण्यासाठी 18 ते 20 तास लागले तसेच 20 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. या रांगोळीसाठी माझ्या सहकार्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. -रोशन पाटील, रांगोळी कलाकार, कसळखंड, ता. पनवेल