गोदामांच्या कमतरतेमुळे हमीभावाने भात खरेदीस अडचणी
कर्जत : बातमीदार
तालुक्यात कर्जत दहिवली मार्केट यार्ड, कशेळे आणि नेरळ अशी तीन हमीभाव भात खरेदी केंद्रे आहेत. मात्र यंदा कशेळे आणि नेरळ येथील केंद्रे बंद असल्याने कर्जत येथील भात खरेदी केंद्रावर कामाचा ताण वाढला आहे. तेथे तालुक्यातील शेतकरी गर्दी करीत असल्याने भात खरेदी करून ठेवण्यास गोदामही अपुरे पडत आहे. त्यामुळे खरेदी केंद्रासमोर शेतकर्यांचा हजारो क्विंटल भात खरेदी न होता तसाच उघड्यावर पडून आहे.
दरम्यान, आपला नंबर लागतो की, नाही या विवंचनेत शेतकरी असून अचानक पाऊस आल्यास भाताचे नुकसान होण्याची भीतीही शेतकर्यांना सतावत आहे.
यापूर्वी भात खरेदी केंद्राला शासनाकडून अतिरिक्त गोदामांची सोय केली जात होती. गोदामांच्या भाड्याचा भार शासन उचलत असे. मात्र बदलत्या शासन निणर्यानुसार आता गोदाम हवे असल्यास भात खरेदी केंद्रालाच स्वतः सोय करावी लागते. शासन गोदामाचे भाडे देणार नसल्याने आर्थिक दृष्ट्या भात खरेदी केंद्राला हे परवडणारे नसल्याने नेरळ भात खरेदी केंद्र बंद आहे. कशेळे केंद्रात खरेदी केलेले भात ठेवण्यासाठी लागणार्या बारदानाची कमतरता आहे. त्यामुळे ही दोन्ही केंद्रे बंद असल्याचे कर्जत भात खरेदी केंद्रांचे व्यवस्थापक केतन खडे यांनी सांगितले.
बहुतांश शेतकरी आपल्याकडील सर्वच भात घरी न ठेवता तथा भरडायला न नेता थेट हमीभाव मिळावा यासाठी खरेदी केंद्रावर आणत आहेत. यामुळेही भात खरेदीसाठी मोठी वाढ झाल्याचे व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.
तालुक्यातील अन्य दोन्ही भात खरेदी केंद्र बंद असल्याने कर्जत भात खरेदी केंद्रावर शेतकर्यांची गर्दी वाढली आहे.तसेच शासनाच्या बदलत्या निर्णयामुळे गोदाम मिळण्यास अडचण येत आहे. परिमाणी भात खरेदीस काहीशा मर्यादा येत आहेत अशी माहिती व्यवस्थापक केतन खडे यांनी दिली.
कर्जत भात खरेदी केंद्रावर कामगारांची कमतरता असल्याने दिवसाला जेमतेम चारशे ते साडेचारशे पोत्यांचा काटा होतो. येथे कामगार वाढविण्याची गरज आहे. तसेच शेतकर्यांच्या हिताचा विचार करून अतिरिक्त गोदामांची सोय उपलब्ध करून सर्व शेतकर्यांचा भात खरेदी करावा, अशी मागणी बारणे येथील शेतकरी दशरथ मुने यांनी केली आहे.