काशीद ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
मुरूड : प्रतिनिधी
अनियमीत वीजपुरवठ्यामुळे काशीद (ता. मुरूड) येथे आलेल्या पर्यटकांना शनिवार व रविवारी मोठा त्रास सहन करावा लागला. वेळोवेळी खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे काशीद ग्रामस्थांसह पर्यटक हैराण झाले असून, वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या ठिकाणी मोबाइल रेंजसुद्धा मिळत नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत.
वीकेण्डला शनिवार व रविवारी हजारो पर्यटक काशीद येथे दाखल झाले. मात्र वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने पर्यटक हैराण झाले. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता खंडित झालेला वीजपुरवठा मध्यरात्री 12 नंतर सुरळीत झाला.
दरम्यान, आल्याने पर्यटकांना सुविधा पोहचवताना स्थानिकांना मोठ्या समस्यांशी सामना करावा लागला. तसेच शनिवार, रविवारीसुद्धा वीजेचा लपंडाव सुरू होता.
महावितरणला काशीद येथून सर्वाधिक महसूल मिळत असतानासुद्धा विजेच्या अनियमिततेकडे कंपनीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तसेच मोबाइल रेंज कमी असल्यामुळे येथील हॉटेलधारकांना पेमेन्ट करताना समस्या येत होती.
काशीदमध्ये शुक्रवार सायंकाळी वीज गायब झाली ती मध्यरात्री परत आली. शनिवार, रविवारीसुद्धा वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. काशीद येथे कायमस्वरूपी वायरमन आवश्यक आहे. जर महावितरणने येथील विजेची समस्या तातडीने सोडवली नाही, तर ग्रामस्थ मोठे आंदोलन करतील.
-संतोष राणे, सदस्य, ग्रामपंचायत काशीद, ता. मुरूड
अवकाळी पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने काशीद परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. काशीदमधील वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविण्याचा महावितरण प्रयत्न करणार आहे.
-श्री. दातीर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण मुरूड