कोशिंबळे येथील कानाडे कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडे धाव
माणगाव : प्रतिनिधी
शेतावर खत टाकण्यासाठी गेलेले आपले वडील तुकाराम लहु कानाडे यांचा मृतदेह दोन दिवसांनी गवतात आढळला. याप्रकरणी माणगाव पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, मात्र माझ्या वडिलांचा मृत्यू संशयास्पद असून, या प्रकरणाची चौकशी गुप्तचर खात्यामार्फत करण्यात यावी, अशी मागणी कोशिंबळे तर्फे निजामपूर (ता. माणगाव) येथील अंकुश तुकाराम कानाडे व त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कोशिंबळे तर्फे निजामपूर येथील तुकाराम कानाडे हे 15 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी आपल्या शेतात खत टाकण्यासाठी गेले होते, ते घरी परत आले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर ते हरवले असल्याची माहिती माणगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी तुकाराम कानाडे यांचा मृतदेह गावापासून 50 मीटर अंतरावर त्यांच्या नातेवाईकांना आढळला होता. पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला होता. या घटनेची नोंद अकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे, मात्र आपल्या वडिलांचा मृत्यू हा संशयास्पद असून तो घातपात आहे, अशी तक्रार मुलगा अंकुश कानाडे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, कानाडे कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सदर प्रकरणाचा तपास निजामपूर दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार श्री. भोजकर यांच्याकडून काढून घेऊन तो महिला पोलीस उपनिरिक्षक प्रियंका बुरूंगळे यांच्याकडे दिला आहे.
कोशिंबळे तर्फे निजामपूर येथील तुकाराम लहु कानाडे यांच्या मृत्यूचा तपास माझ्याकडे असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सध्या या प्रकरणाचा कायदेशीर मार्गाने तपास सुरू आहे.
-प्रियंका बुरूंगळे, तपासिक अंमलदार, महिला उपनिरिक्षक, माणगाव