परळी ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याच्या दौर्यावर असून, बुधवारी बीडमध्ये पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावरून राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. लोक पक्ष सोडून जातील या भीतीने शरद पवार यांनी उमेदवारांची घोषणा केली, असे म्हणत राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवरून पवारांना टोला लगावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या दौर्यावर आहे. सोलापूर, उस्मानाबादनंतर पवार यांची बुधवारी बीडमध्ये सभा झाली. या वेळी पवार यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शरद पवारांनी यादी जाहीर करताना परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे, गेवराई येथून विजयसिंह पंडित, केज येथून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगाव येथून प्रकाश सोळंके यांच्या नावांची घोषणा केली. शरद पवार यांनी पाच उमेदवारांची घोषणा केल्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नेते-कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जात आहे. त्या भीतीमुळेच शरद पवारांनी उमेदवारांची घोषणा केली आहे, असे सांगत परळीतून धनंजय मुंडे यांच्या उमेवारीवर पंकजा म्हणाल्या, परळीची आमदार मीच होणार आहे.
पंकजांचा शरद पवारांसह धनंजय मुंडेंवर निशाणा
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांना बीडमध्ये येऊन उमेदवार घोषित करावे लागणे म्हणजे तेथील राष्ट्रवादीची स्थानिक फळी कमकुवत झाली असेच म्हणावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला. धनंजय मुंडे यांची उमेदवारी माझ्यासाठी आव्हान नाही, असेही त्या म्हणाल्या.