नारायण राणे यांचा विश्वास; सावंतवाडी येथे पत्रकारांसोबत संवाद
सावंतवाडी : प्रतिनिधी
मी जेव्हा शिवसेनेत होतो, तेव्हा जिल्हा शिवसेनामय होता. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर जिल्हा काँग्रेसमय केला. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पूर्ण कोकण भाजपमय करणार असल्याचा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. नारायण राणे यांनी म्हटले की, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदार आणि सर्व आमदार हे भाजपेच असतील. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पूर्ण कोकण भाजपमय करणार असल्याचे त्यांनी म्हटले. मागील काही महिन्यांपासून नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र नारायण राणे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडत आहे. त्यामुळे नारायण राणे यांचा भाजप प्रवेश कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नाणार प्रकल्पाबाबत भाष्य करताना काय भूमिका घ्यायची मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर घेणार असल्याचे राणे यांनी सांगितले. दरम्यान, आमदार नितेश राणेदेखील नाणार प्रकल्पग्रस्तांची मते अजमावून घेणार आहे. प्रकल्पबाधित गावांशी चर्चा करून, संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेऊन मग भूमिका जाहीर करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.