Breaking News

कळंबोली व रोडपाली येथील खड्डे भरण्यास सुरुवात

स्त्री शक्ती फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश

पनवेल ः वार्ताहर

कळंबोली व रोडपाली येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे बर्‍याच ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या संदर्भात स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने सिडको व महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. या मागणीची दखल घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

स्त्री शक्ती फाउंडेशन अध्यक्ष विजया चंद्रकांत कदम यांच्या पुढाकाराने शैलेश कुमार मिश्रा, चिमाजी मेंगडे, सुभाष सारतापे, बालकृष्ण म्हात्रे, अक्षय म्हात्रे, ज्ञानोबा पंडित, दत्तात्रय मोरे आदींनी सिडको चे अधिकारी  मोहिले, बनकर व चिखलकर व पालिकेचे संजय जगताप यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले होते.

यात त्यांनी म्हटले आहे की, सेक्टर 1 सुधागड स्कुल रिक्षा नाका, सेक्टर 2ई पोलीस ठाण्याजवळील रिक्षानाका, रोडपाली बस डेपो जवळील रिक्षानाका व डी मार्टजवळील रिक्षा नाका अशा सर्व नाक्यावरील रिक्षाचालकांनी तक्रारी केल्या होत्या.

रोज खड्डेमय रस्त्यामुळे त्यांना रिक्षा चालविण्यास त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अनेक दुचाकीचालकांचे अपघात होत आहेत. एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? यासाठी स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने सिडको आणि महापालिकेला निवेदन देण्यात आले होते.

या वेळी अधिकार्‍यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरच बुजवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने स्त्री शक्ती फाउंडेशन अध्यक्ष विजया कदम यांनी त्यांचे आभार मानले आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply