Breaking News

भारतीय महिलांची विंडीजवर मात

मालिकाही जिंकली

अ‍ॅटिग्वा : वृत्तसंस्था

मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय महिला संघाने अखेरच्या वन-डे सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघावर मात करीत मालिकेत बाजी मारली आहे. तिसर्‍या सामन्यात भारतीय महिलांनी मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर सहा गडी राखून विजय मिळवला. स्मृतीलाच सामनावीरचा पुरस्कार मिळाला.

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांची सुरुवात अतिशय खराब झाली. विंडीजच्या निम्मा संघ 100 धावांच्या आत माघारी परतला. यानंतर कर्णधार स्टेफनी टेलरचे अर्धशतक आणि अखेरच्या फळीत स्टेसी किंगने फटकेबाजी करीत दिलेल्या साथीमुळे विंडीजच्या महिलांनी 194 धावांपर्यंत मजल मारली. टेलरने 79 धावा केल्या, तर किंगने 38 धावांची खेळी केली. भारताकडून झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यांना शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी आपल्या डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. स्मृती मंधाना आणि जेमायमा रॉड्रीग्ज यांनी पहिल्या विकेटसाठी 141 धावांची शतकी भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यानच विंडीजचा पराभव निश्चित झाला होता. स्मृती मंधानाने 74, तर रॉड्रीग्जने 69 धावा केल्या. या दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर पुनम राऊत आणि मिताली राज यांनी फटकेबाजी करीत भारताला विजयाच्या जवळ आणून सोडले, मात्र या दोन फलंदाजही बाद झाल्या. त्यानंतर दिप्ती शर्माने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply