महाराष्ट्राच्या महासंग्रामाचे अर्थात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. महिनाभर हा निवडणुकोत्सव रंगणार आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या वेगवेगळ्या निवडणुका असो की विधिमंडळ सभागृहातील कामकाज; सत्ताधारी सरस आणि विरोधक निष्प्रभ असेच चित्र राज्यात पाहावयास मिळाले. सद्यस्थिती पाहता होऊ घातलेल्या निवडणुकीतूनही वेगळा कल समोर येईल, अशी शक्यता दिसत नाही.
केंद्रात सत्ताधारी भाजपचा दणदणीत विजय झाला आणि विरोधक प्रामुख्याने काँग्रेस पक्ष पुन्हा आडवा झाला. प्रादेशिक पक्षांचे प्रयोगही यशस्वी होऊ शकले नाहीत. अनेक आघाड्यांची पुरती वाताहत झाली. महाराष्ट्रातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षांची महाआघाडी करिष्मा करू शकली नाही. राष्ट्रवादीने आपल्या चार जागा राखल्या. (उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशाने राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या तीनवर आली आहे.) काँग्रेसला मात्र अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यानंतर सुरू झाली ती मेगागळती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसमधील बडे नेते भाजप, शिवसेनेत दाखल होऊ लागले. त्याचा फटका राष्ट्रवादीला जास्त बसला, पण कोमात गेली काँग्रेस. राष्ट्रवादीच्या बुडत्या जहाजाला पक्षाध्यक्ष शरद पवार टेकू देण्याचा निदान प्रयत्न तरी करीत आहेत, मात्र तळ गाठायला लागलेल्या काँग्रेसला वाचवण्यासाठी पक्षनेतृत्वाकडून काहीच हालचाली होताना दिसत नाहीत. हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना आजारपणामुळे मर्यादा आल्या आहेत. अशा वेळी युवराज राहुल गांधी यांनी किल्ला लढविणे अपेक्षित होते, परंतु अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवून ते मोकळे झाले. आता ते अधूनमधून सरकारविरोधात टीका करतात आणि बराच काळ गायब असतात. याचा परिणाम साहजिकच पक्षसंघटनेवर झाला आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विजनवासात गेले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मर्यादा आहेत. वयपरत्वे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आता धावपळ करू शकत नाहीत,
तर विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव जाणवत नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी ज्येष्ठ मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पक्षाला सांभाळू शकेल असा नेता सध्यातरी राज्यामध्ये दृष्टिक्षेपात नाही.
सत्तेवाचून तडफडणार्या काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत आघाडी केली आहे. काही छोटे पक्ष सोबतीला आहेत, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या आघाडीत स्थान मिळू शकले नाही. विशेष म्हणजे याच मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत युतीविरोधात प्रचाराची राळ उडवून दिली होती. त्यांचे प्रमुख लक्ष्य भाजप होते. अर्थात त्याचा फायदा ना आघाडीला झाला ना मनसेला. राज यांचा लोकसभेला वापर करून आघाडीने त्यांचे ‘इंजीन’ यार्डात पाठविले आहे. पक्षाची धूळधाण उडालेले राजही विधानसभा निवडणूक लढण्यास सुरुवातीला तयार नव्हते, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मनसे मैदानात उतरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रतिकूल स्थितीत त्यांचा निभाव लागणे अवघड आहे.
मनसेच्या आधीपासूनच वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. मध्यंतरी जागावाटपावरून वंचित आघाडीत फूट पडून एमआयएम काडीमोडापर्यंत पोहोचली होती, पण महाराष्ट्रात शिरकाव करण्यासाठी एक पाऊल मागे घेण्याची तयारी या पक्षाने दर्शविली आहे. पारंपरिक दलित व मुस्लिम मतदार ‘वंचित’कडे वळल्याने दोन्ही काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
मुख्य म्हणजे सत्ताधार्यांचे मोठे आव्हान काँग्रेस आघाडीपुढे आहे. खासकरून भाजपचा झंझावात संपूर्ण राज्यभर आहे. मागील पाच वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यय आलेला आहे. पूर्वी शहरी भागापुरता मर्यादित असलेला हा पक्ष एव्हाना तळागाळात पोहोचला आहे. सत्ता आहे म्हणून स्वस्थ न बसता अधिकाधिक लोक पक्षाशी कसे जोडले जातील यासाठी निरनिराळे कार्यक्रम भाजपच्या माध्यमातून राबविण्यात आले. पक्षसंघटना बळकट करण्यावर जोर दिल्याने देशाचा पंतप्रधान ते गावचा सरपंच अशी भाजपची ताकद उभी राहिली आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेद्वारे राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. या यात्रेची नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये सांगता झाली. यानिमित्ताने भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
भाजपखालोखाल शिवसेनाही जम बसवू पाहत आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे भाजप, शिवसेना हे पक्षही स्वतंत्रपणे लढले होते. तेव्हा भाजपने 288पैकी सर्वाधिक 122 जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ शिवसेनेला 63 जागी यश मिळाले, तर काँग्रेस, राष्ट्रवादीला अनुक्रमे 42 व 41 जागांवर समाधान मानावे लागले होते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सत्ताधार्यांच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले. जनतेचा हा कल आणि पक्षांतर्गत झालेल्या पडझडीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली नसती तरच नवल. जास्त आढेवेढे न घेता हे पक्ष एकत्र आले.
दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यानंतर आता भाजप, शिवसेना युती होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक जाहीर झाल्याने युतीचा फैसला लवकरच होईल, पण सध्याच्या घडीला याच दोन पक्षांमध्ये स्पर्धा आहे. त्यामुळे युती झाली तर ठीक आणि नाही झाली तरी त्यांचा सामना करणे विरोधकांना सोपे नाही. येत्या काही दिवसांत युतीबाबत घोषणा व जागावाटप झाल्यानंतर राज्यातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)