राहुल शिक्षक प्रसारक मंडळाचा डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त
हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या राहुल शिक्षक प्रसारक मंडळाच्या वतीने 131 नवउद्योजकांना रोजगाराची संधी तसेच स्वबळावर उभे राहण्याचे दृष्टीने मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्ताने महोत्सवाचे आयोजन करून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. याबाबत सोमवार (दि. 11) सत्याग्रह महाविद्यालयात संस्थेचे संचालक डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून या महोत्सवाबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी प्राचार्य वनिता सूर्यवंशी, प्रा. संगीता जोगदंड आदी उपस्थित होते. डोंगरगावकर यांनी स्पष्ट केले की, 21 व्या शहतकातील आव्हाने पेलवणारे मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने संस्थेने आखलेले नवे प्रकल्प आणि उपक्रम याबाबत या वेळी माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे नवी मुंबईमध्ये येऊ घातलेले आंतराष्ट्रीय विमानतळ यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार, उद्योग येणार आहेत. स्थानिक पातळीवर याकरीता जास्तीत जास्त उद्योजक घडणे गरजेचे असल्याने अशा नव्या उद्योजकांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. याकरीता जिल्हा उद्योजक प्रशिक्षण केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडियासारख्या योजनांची माहिती व प्रशिक्षण या शिबिरात दिली जाणार असल्याची माहिती डॉ. डोंगरगावकर यांनी दिली. 13 एप्रिल ते 13 मेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 12 तास अभ्यास वाचन स्पर्धा, वक्तृत्व, निबंध स्पर्धा, विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा, ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, सामाजिक न्यायावर आधारित चर्चासत्र आदी कार्यक्रमांचा यामध्ये समावेश आहे.