जेएनपीटी : प्रतिनिधी
उरण तालुक्याला समुद्र किनारे व खाड्यांचे वरदान असून या विभागात मत्स्य उद्योगामार्फत जनतेला उपजीविकेचे साधन निर्माण होत असताना सध्या हे खाडी किनारे, बंदरे स्मगलर्स व चोरट्या व्यापार्यांचे केंद्रबिंदू ठरू लागल्याने उरणचे खाडी किनारे, बंदरे सध्या असुरक्षित झाल्याचे दिसून येत आहे.तरी देशाच्या सुरक्षिततेच्या दुष्टीने या बंदराची, किनारपट्टीची सुरक्षा वाढविणे काळाची गरज आहे. उरण तालुक्याला भव्य समुद्र किनारा व दंतूर खाड्यांचे वरदान लाभले आहे. करंजा, मोरा ही तालुक्याची महत्त्वाची बंदरे असून खोपटे, वशेणी, दिघोडे, केगाव, आवरे या विभागात समुद्र किनारी व खाड्यांमध्ये जनता मोठ्या प्रमाणात मासेमारी करतात, त्यामुळे येथील जनतेला मोठ्या प्रमाणात उपजीविकेचे साधन निर्माण झाले असून या मत्स्यव्यवसायात मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होते, मात्र जनतेच्या उपजीविकेचे साधन असणार्या खाड्यांवर सध्या स्मगलर्स व चोरट्यांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. हे चोरटे तर रात्रीच्या वेळी
मोरा, करंजा, वशेणी खाडीवरून तेलाची, डिझेलची मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक करत आहेत. त्यात जागतिक कीर्तीच्या जेएनपीटी बंदरातून शिंपिग कंपन्यांच्या आणि सीमा शुल्क अधिकार्यांच्या कृपाशीर्वादाने अंमली पदार्थांची, रक्तचंदनाच्या तस्करीबरोबर आता स्मगलर्सनी आपला मोर्चा सोन्याच्या तस्करीकडे वळवला असल्याचे जेएनपीटी बंदरात पकडण्यात आलेल्या करोडो रुपये किमतीच्या सोन्याच्या मुद्देमालातून पुढे आले आहे.सध्या देशाला दहशतवाद्यांचा मोठा धोका असताना उरणच्या समुद्र किनार्यावर जेएनपीटी बंदरातून चालणारे चोरीचे, स्मगलर्सचे हे धंदे चिंतेची बाब ठरणार आहे. मुंबईवर 1993 साली झालेला बॉम्बस्फोट हल्ला किंवा 26/11चा दहशतवादी हल्ला करणारे दहशतवादी अतिरेकी समुद्र मार्गानेच मुंबईत आले होते. त्यामुळे आज जरी शिंपिग कंपन्यांच्या, सीमा शुल्क विभागाच्या म्हणण्यानुसार सोन्याने भरलेला कंटेनर सिंगापूर येथून जेएनपीटी बंदरात आला असला, तरी त्याचे मुख्य सूत्रधार हाती न लागणे हीच खरी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोक्याची घंटा आहे.