ग्रामीण भागातील 50 टक्के घरं कुलूपबंद
गड्या आपला गाव बरा असं म्हणणारी पिढी आता दुर्मिळ होऊन बसली आहे. पोटासाठी गाव सोडून गेलेले गावाकडे येण्यास तयार नाहीत. तरुणांची मोठी फौज शहराकडे गेली आणि गावात उरले ते फक्त वयोवृद्ध. या स्थलांतरामुळे ग्रामीण भागातील 50 टक्केहून अधिक घरांना कुलपे लागली आहेत. एकेकाळी गजबजलेली गावे आता ओस पडू लागली आहेत. शासनाचे लाखो रुपये खर्ची पडून देखील स्थलांतर आणि गावातील समस्या काही केल्या सुटत नसल्याचे चित्र दिसत आहे.
कोकणातील गजबजलेली घरे, दाट झाडी, पाळीव जनावरांची लगबग, पुरेसे दुधदुभते हे वातावरण काळाच्या ओघात धूसर होत गेले आहे. गजबजलेली घरे आज बंद पडली आहेत. गावात एक दुसर्याकडेच पाळीव जनावरे, दूध संकलन केंद्र बंद पडली, प्राथमिक शाळा ओस पडू लागल्या. गावात केवळ वयोवृद्ध माणसेच उरली आहेत. यामुळे ग्रामीण भागातील 50 टक्केहून अधिक घरे कुलूपबंद आहेत. नोकरीनिमित्त गाव सोडून गेलेले चाकरमनी वर्षातून एकदाच गावाचे तोंड पाहतात. गणेशोत्सव आणि शिमगा हे कोकणातील प्रमुख सण असल्याने या सणाला हे चाकरमनी आवर्जून गावाला येतात. याच दिवसात गावातील बंद घरांची कुलपे उघडली जात आहेत. महाड तालुक्यात ही अवस्था प्रत्येक गावात पाहावयास मिळत आहे. गावातील घरे बंद असल्याने गावे सामसूम झाली आहेत. महाड तालुका हा रायगड जिल्ह्यातील आर्थिक, औद्योगिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला महत्त्वाचा तालुका आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात हा तालुका कायम अग्रेसर राहिला आहे. तालुक्यातील गावांची संख्या 183 असून 2011च्या जनगणनेनुसार महाड तालुक्याची लोकसंख्या जवळपास दोन लक्ष इतकी आहे. क्षेत्रफळाने देखील या तालुक्याचा विस्तार मोठा आहे. असे असले तरी तालुक्यात गावागावात रस्ता आणि पाण्याच्या योजना पोहचल्या आहेत, मात्र गेल्या 20 वर्षात दुरुस्ती न झाल्याने हे रस्ते आणि पाणी योजना ठप्प झाल्या आहेत. रस्ता तिथे एसटी या ब्रीदवाक्यातून एसटी बस देखील गेली. पिण्याच्या पाण्यासाठी करोडो रुपये खर्च झाले आहेत. गावातील विकासात्मक कामांवर देखील शासनाने खर्च केला आहे, पण गावात या विकासाचे वारसदार मात्र शहरात जावून बसले आहेत. निवडणुका आल्या, एखादा सण आला तरच हे तरुण गावी येत आहेत. यामुळे तालुक्यातील सर्वच गावांची संख्या कागदावर दिसत असली, तरी प्रत्यक्षात 50 टक्केहून अधिक घरे कुलूपबंद आहेत.गावातील लोकसंख्या घटल्याने याचा परिणाम गावातील शाळा, अंगणवाड्यांवर झाला आहे. गावात एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर मुंबईकरांवर निर्भर राहावे लागत आहे. एव्हढेच नव्हे तर गावातील निवडणुका देखील मुंबईकर चाकरमान्यांच्या शब्दावर चालतात. गावातील सण-उत्सवांचे आयोजन देखील याच मुंबईकर तरुणांच्या निर्णयावर अवलंबून आहे. यामुळे एकीकडे विकासाच्या योजना राबवताना गावातील वयोवृद्धांना थातूरमातूर कारणे आणि माहिती देऊन शासकीय अधिकारी गावागावांत योजना राबवताना त्यात कामचुकारपणा करीत आहेत. याचा परिणाम मात्र गावातील विकासावर होत आहे. गावातील खचाखच भरून जाणार्या एसटीच्या फेर्या देखील काळाच्या ओघात बंद पडल्या आहेत. गावातील टेलिफोन कोनाड्यात धूळखात पडले आहेत. मोबाईल क्रांती झाली असली, तरी ग्रामीण भागात अद्याप रेंज पोहोचणे कठीण आहे. यामुळे संपर्क यंत्रणा देखील तुटली आहे. उरलेल्या वयोवृद्धांना मुंबईकर चाकरमनी आणि आपल्या पेन्शनवर दिवस काढावे लागत आहेत. अंतिम क्षणी देखील मुंबईकर येऊ द्या म्हणत वाट पाहावी लागत आहे.
-महेश शिंदे