सातारा : हरेश साठे
ज्ञानाच्या आधाराशिवाय प्रगती होत नाही. म्हणून ती संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे हे उद्दिष्ट पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे राहिले. त्यामुळेच रयत शिक्षण संस्था देशातील एक नंबरची संस्था झाली असून लोकनेते रामशेठ ठाकूर या संस्थेच्या कार्याला मदतीचा हात खुला करून देत असतात, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी (दि. 9) येथे केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 63वा पुण्यतिथी कार्यक्रम खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून दानशूर व्यक्तींचा सन्मान, गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर संस्थेतील उत्कृष्ट शाखांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव विठ्ठल शिवणकर, सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार आशुतोष काळे, आमदार शशिकांत शिंदे, संस्थेचे सहसचिव संजय नागपुरे, ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे तसेच जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, पी. जे. पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत यांच्यासह पदाधिकारी आणि रयतसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेला जेव्हा जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमी हाकेला साद देऊन संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव योगदान देत असतात. कर्तृत्व, दातृत्वाबरोबरच राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीयांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते कर्मवीरभूमीत समारंभपूर्वक हृद्य सत्कार करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेला मातृसंस्था माणून रयतेच्या विकासासाठी सदैव कार्यरत असणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेला या वर्षी एक कोटी 95 लाख रुपयांची देणगी, शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी एक कोटी 30 लाख रुपये, तर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी 59 लाख 90 हजार रुपयांची भरघोस देणगी दिली. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, पुस्तक, श्रीफळ, रयत वस्त्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शकुंतला ठाकूर यांचा सन्मान आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वीकारला.
आपल्या भाषणात पुढे बोलताना खासदार शरद पवार यांनी सांगितले की, कर्मवीर अण्णांनी शिक्षणाचे काम हाती घेतले आणि त्यात आपले सर्वस्व झोकून दिले. अण्णांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात झाले, तर त्याला खत देण्याचे काम समाजातून झाले. अण्णांचे स्वप्न असलेल्या रयत शिक्षण शिक्षण संस्थेचे विद्यापीठ लवकरच साकारणार आहे.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …