Breaking News

ग्रा. पं. निवडणूक निकाल – प्रस्थापितांना धक्काच

रायगड जिल्ह्यात नुकत्याच 90 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्के बसले आहेत. 50 वर्षे सत्ता असलेल्या ग्रामपंचायती सत्ताधार्‍यांच्या हातून गेल्या आहेत. या निवडणुकीत एक एक बात स्पष्ट झाली, ती म्हणजे राष्ट्रवादी आणि शेकापच्या आघाडीसोबत जाण्यास रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते तयार नाहीत. त्यांनी शिवसेनेला सहकार्य केले आहे. हेच चित्र लोकसभा निवडणुकीत असू शकते. त्यामुळे हे निकाल शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी धोक्याचा इशारा आहे.

या निवडणुकीत शिवसेना मोठा पक्ष ठरला आहे. त्यांनी 31 ग्रापंचायती जिंकल्या. शेकापने 19, राष्ट्रवादी काँग्रेसने 20, काँग्रेसने 9, ग्रामविकास आघाडीने 9, तर भाजपने 2 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी 39 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. शिवसेना व इतर विरोधी पक्षांनी मिळून 51  ग्रामपंचायती जिंकल्या. याचा अर्थ असा होतो की शेकाप-राष्ट्रवादी आघाडीपेक्षा विरोधकांनी जास्त ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यात काँग्रेेसचे कार्यकर्ते शेकाप-राष्ट्रवादीसोबत जाण्यात तयार नाहीत. त्यांनी शिवसेनेशी जुळवून घेतले आहे. याचा सर्वात जास्त फटका अलिबाग तालुक्यात शेकापला बसला आहे. अलिबाग तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यातील 20 ग्रामपंचायतींवर शेकापची सत्ता होती. पाच विरोधकांकडे होत्या. शेकापकडे 12 ग्रामपंचायती राखल्या, एक ग्रामपंचायत विरोधकांकडून खेचून घेतली. शेकापने एकूण 13 ग्रामपंचायती जिंकल्या, परंतु 8 ग्रामपंचायती गमावल्या. विरोधकांनी 12 ग्रामपंचायती जिंकल्या. एक गमावली, पण शेकापकडून 8 ग्रामपंचायती हिसकावून घेेतल्या. आंबेपूर, चरी, बेलकडे, भिलजी-बोरघर, सुडकोली, पोयनाड, धोकवडे, रामराज, श्रीगाव ,शहापूर, सहाण, वरंडे या ग्रामपंचायती शेकापने राखल्या. काँग्रेसकडे असलेली कावीर शेकापने जिंकली. बेलोशी, कुर्डूस, चिंचोटी, बामणगाव, आगरसुरे, सारळ या ग्रामपंचायतींवर काँग्रेसची सत्ता आली. कुसूंबळे, कुरकूंडी-कोलटेंबी, ताडवागळे, ढवर, थळ व चौल या ग्रामपंचायती शिवसेनने जिंकल्या. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शेकाप, काँग्रेेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी झाली आहे. या आघाडीतर्फे रायगडचे माजी पालकमंत्री सुनील तटकरे हे उमेदवार असतील. शेकाप-राष्ट्रवादीचे नेते जरी एकत्र आले असले, तरी ते काँग्रेेसला जुमानत नाहीत. त्यामुळे काँग्रेेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. विशेषतः अलिबाग व पेण तालुक्यातील काँग्रेेसचे कार्यकर्ते शेकाप आणि राष्ट्रवादीवर नाराज आहेत. सुनील तटकरे यांनी आपल्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना फसविले आहे, अशी काँगेसच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे या तालुक्यातील नेत्यांनी शिवसेनेशी दोस्ती करण्यास सुरुवात केली आहे. हे असेच चित्र लोकसभेच्या निवडणुकीत देखील असेल. जर शेकापचे व राष्ट्रवादीचे नेते आम्हाला जुमानत नसतील, आघाडीमध्ये सत्तेचा जो वाटा काँग्रेेसला मिळाला पाहिजे तो देण्यास तयार नसतील, तर आम्ही त्यांच्यामागे फरफटत का जायचे, असे काँग्रेसचे कार्यकर्ते उघड बोलू लागले आहेत. रायगड जिल्ह्यात आमच्या पक्षाची ताकदच उरलेली नाही असे त्यांना वाटत असेल, तर आम्हाला आमची ताकद दाखवावीच लागेल, असे काँगेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आपल्याला फसवलं जातंय या भावनेनेच काँगेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी उघडपणे शिवसेनेची साथ धरली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची ही नाराजी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेेचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या फायद्याची ठरणार आहे. आपली वेळ आली की गोड बोलायचे आणि वेळ निघून गेल्यावर ओळख दाखवायची नाही असे होणार असेल, तर तिला मैत्री म्हणता येत नाही. एकीकडे शिवसेना व भाजपची युती झाली आहे. नाराज असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेबरोबर जात आहेत. हे रायगड जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींच्या निकालावरून स्पष्ट होते. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवर लढवल्या जातात. लोकसभा निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवर लढवली जाते हे खरे आहे, पण ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल कल दर्शवताना काही संकेत देत असतात. रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते शेकाप-राष्ट्रवादीसोबत जायला तयार नाहीत. हे या वेळच्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांवर स्पष्ट झाले आहे. हा निकाल शेकाप-राष्ट्रवादीला धोक्याचा इशारा देणारा आहे.

-प्रकाश सोणावडेकर

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply