Breaking News

विस्तारित गावठाण सर्वेक्षण होणार

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

नवी मुंबई : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षापासूनचा विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या मंगळवारपासून बेलापूर गावातून विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणास सुरुवात होणार आहे. सदर सिटी सर्वेक्षण सिडको व जिल्हाधिकारी कार्यालयातून नियुक्त केलेल्या पी. एन. शिदोरे सिव्हिल इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लि. या कंपनीमार्फत करण्यात येणार असून सदर सर्वेक्षणास सिडकोचे अधिकारी, तसेच बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे या स्वतः उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका व सिडको प्राधिकरण क्षेत्रातील गावठाण व विस्तारित गावठाणाचे नगरभूमापन (सिटी सर्व्हे) तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयातून देण्यात आले असताना महापालिका व सिडको फक्त मूळ गावठाणांचे सिटी सर्व्हे करीत होती. मुख्यमंत्री सचिवालयाच्या आदेशानुसार विस्तारित गावठाणांचाही सिटी सर्व्हे होणे जरुरी होते. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन नवी मुंबई क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांचा मूळ गावठाणाबरोबरच गावठाण विस्तार योजनेंतर्गत घरांचा सिटी सर्व्हे राहिलेला असून तो सिटी सर्व्हे सुरू करण्याच्या दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने ती कार्यवाही त्वरित करावी यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून विस्तारित गावठाणाचे सर्वेक्षण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मंगळवार 5 मार्चपासून विस्तारित गावठाणाचे सिटीसर्वेक्षण सुरू होत असल्याने सर्व ग्रामस्थांनी आपल्या घरांची सर्व कागदपत्रे संबंधित अधिकार्‍यांना देण्याकरिता तयार ठेवावीत, असे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले. या वेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी  मुंबईतील  प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या 100 टक्के जमिनी सिडकोस दिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचे सर्वेक्षण होऊन ती घरे त्वरित त्यांच्या नावे झाली पाहिजेत. हा त्यांचा हक्क आहे. आज विस्तारित गावठाणाचे सिटी सर्व्हेक्षण सुरू होत असल्याने मी केलेल्या प्रयत्नांचे सार्थक झाले असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदर सर्वेक्षण माझ्या बेलापूर गावातून होत असल्याने मला सर्वाधिक आनंद आहे. सर्वेक्षण करताना ग्रामस्थांना त्वरित घरांच्या सर्वेक्षणाचा क्रमांक देण्यात येणार असून ग्रामस्थांनीही आपल्या घरांची सर्व कागदपत्रे व पुरावे तयार ठेऊन संबंधित अधिकार्‍यांना सहकार्य करावे. सदर प्रश्न मार्गी लागल्यामुळे अनेक प्रकल्पग्रस्त संघटना, ज्येष्ठ ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त संस्था यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आभार मानले असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply