Breaking News

देवेंद्र (पर्व) सुस्साट!

दूरदर्शनच्या महाजनादेश कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि मग चटकन लेखाचं शीर्षक सुचलं. देवेंद्रपर्वाचा शिल्पकार! पण मग विचार केला की हा मर्यादित मुद्दा होईल. खरं म्हणजे ’देवेंद्र पर्व सुस्साट’, ’झंझावाती देवेंद्र पर्व’ हेच म्हणणे योग्य ठरेल. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे तसं पाहायला गेलं तर एकदम नवीन, ताजेतवाने नेतृत्व म्हणावे लागेल. देवेंद्र पर्वचे खरे शिल्पकार आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे. 2013 साली भारतीय जनता पक्षाचे घटना दुरुस्ती अधिवेशन मुंबईत नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात भरले होते. नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि घटना दुरुस्ती करून त्यांना तीन वर्षांचा कार्यकाल आणखी एकदा वाढवून देण्यात येणार होता. हीच घटना दुरुस्ती राज्यांच्या अध्यक्षांना सुद्धा लागू करण्यात येणार होती. घटना दुरुस्ती झाली, परंतु अचानक पूर्ती कारखान्याचे नसलेले प्रकरण पुढे आले आणि गडकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजनाथ सिंह हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते सुधीरभाऊ मुनगंटीवार.

घटना दुरुस्तीमुळे सुधीरभाऊ आणखी तीन वर्षे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहू शकत होते, परंतु गोपीनाथराव मुंडे यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पुन्हा पदावर राहायला विरोध केला. मुनगंटीवार जर प्रदेशाध्यक्षपदावर कायम राहिले, तर मी पक्षत्याग करीन, अशी भूमिका मुंडे यांनी घेतली. गोपीनाथराव मुंडे यांनी मुनगंटीवार यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढे केले. एक अत्यंत अभ्यासू, उच्चविद्याविभूषित आणि तरुण असा नवा कोरा चेहरा देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मुंडे यांनी पुढे आणला होता.

1997 साली गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्रातील शिवशाही सरकारचे उपमुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर होते. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील नेते आहेत. ते नितीन गडकरी यांच्यासमवेत घनिष्ट संबंध असणारे नेते आहेत, मग गडकरी गटाच्या फडणवीस यांचे नाव मुंडे यांनी कसे काय सुचविले? पण देवेंद्र फडणवीस हे ना तर गडकरी गटाचे होते ना मुंडे गटाचे. ते आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक. झालं, देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर विराजमान झाले. याच वेळी नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. पायाला भिंगरी लावून नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात झंझावात निर्माण केला.

2014 साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत एकेकाळी दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचे तब्बल 282 खासदार निवडून आले आणि काँग्रेसेतर पक्षाला 543 सदस्य असलेल्या लोकसभेत पहिल्यांदा स्पष्ट बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी यांनी मनात आणलं असतं, तर निव्वळ भारतीय जनता पक्षाचे एकाच पक्षाचे बहुमताचे सरकार स्थापन करू शकले असते, पण त्यांनी तसे न करता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन केले. मंत्रिमंडळ बनविताना नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील नितीन गडकरी आणि गोपीनाथराव मुंडे यांचा समावेश निश्चित करतील अशी अपेक्षा होती, परंतु केवळ नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता आणि गोपीनाथराव मुंडे यांचा समावेश त्या यादीत नव्हता. तेव्हा महाराष्ट्रात एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते होते आणि देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष असल्याने गोपीनाथराव मुंडे यांनी फडणवीस आणि खडसे या दोघांना दिल्लीत बोलावून घेतले. फडणवीस आणि खडसे हे दोन्ही नेते नवी दिल्ली येथे पोहोचले. मुंडे यांनी या दोन्ही नेत्यांशी चर्चा केली आणि आपले नाव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. आता काय करायचं? नरेंद्र मोदी यांच्या दरबारात जाणार कोण? अखेर देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना नरेंद्र मोदी यांच्या दरबारात जाणे सहज शक्य होते. त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे मोदी यांच्या दरबारात हजर झाले.

देवेंद्र फडणवीस यांनी मोदी यांच्या समवेत चर्चा केली. मुंडे यांचा समावेश मंत्रिमंडळाच्या यादीत नसल्याचे सांगताना मोदी म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक येत्या दोन दिवसांत मी बोलाविणार असून या बैठकीत गोपीनाथराव मुंडे यांचे नाव भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येणार आहे. मी जर आता मुंडे यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात केला, तर त्यांचे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होईल, मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार मला आणायचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि नरेंद्र मोदी यांच्या समोर युक्तिवाद केला की, मोदीजी आपण म्हणता ते बरोबर आहे, पण आपण दुसर्‍या बाजूने विचार केला की मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले आणि त्यांना जे कोणतेही खाते आपण द्याल, तर त्या खात्यामार्फत येत्या सहा महिन्यांत महाराष्ट्राकडे निधी वळविला, तर त्याचा आपल्या पक्षालाच फायदा होऊ शकेल. नरेंद्र मोदी यांना देवेंद्र फडणवीस यांचा हा युक्तिवाद तंतोतंत पटला आणि त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात केला. नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात देवेंद्र फडणवीस हे नाव पक्के बसले.

दुर्दैवाने 3 जून 2014 रोजी गोपीनाथराव मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलली. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात जो दुवा मुंडे यांच्या रूपाने होता तो निखळला होता. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षात कोअर कमिटी स्थापन करण्यात आली. देवेंद्र फडणवीस हे या समितीचे प्रमुख होते आणि त्यात सुधीरभाऊ मुनगंटीवार, एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश महेता यांच्या बरोबरीने पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 15 ऑक्टोबर 2014 रोजी घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. 25 सप्टेंबर 2014 रोजी गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती तोडण्याची घोषणा एकनाथ खडसे यांनी केली. त्यानंतर केवळ अर्ध्या तासात 15 वर्षे महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची आघाडीसुद्धा तोडण्यात आली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या.  15 ऑक्टोबर 2014 रोजी मतदान घेण्यात आले आणि 19 ऑक्टोबर 2014 रोजी मतमोजणी झाली.

भारतीय जनता पक्ष 123 जागा जिंकून 288 सदस्यांच्या सभागृहात अव्वल ठरला, तर सर्व विरोधकांना अंगावर घेऊन अभिमन्यू सारखी लढत दिलेल्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदरात 63 जागा पाडून घेतल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पंधरा वर्षे सत्ता उपभोगलेल्या पक्षांना अनुक्रमे 42 आणि 41 जागाच मिळविता आल्या.  बहुमत कुणालाही मिळाले नाही म्हणून चाणाक्ष शरद पवार यांनी न मागता भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा जाहीर करून टाकला. वास्तविक जनादेश हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांना नैसर्गिक मित्र असा मिळून होता, पण 25 सप्टेंबर रोजी युती तुटल्याने दोन्ही पक्षांमध्ये गढूळ वातावरण निर्माण झाले होते.

अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नवा चाणक्य उदयाला आला होता आणि त्यांनी शरद पवार यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे 22 वर्ष जेवढी बदनामी सहन करावी लागली नाही तेवढी केवळ 22 दिवसांत सहन करावी लागली, अशा शब्दांत टोला लगावला होता. 12 नोव्हेंबर 2014 रोजी अल्पमतातील सरकारने बहुमताचे शिवधनुष्य उचलले होते खरे, परंतु तसे पाहता हे सरकार अल्पमतातलेच असल्याने ते जर पाच वर्षे टिकवायचे असेल, तर शिवसेनेला सोबत घेणे अपरिहार्य होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपले विश्वासू सहकारी चंद्रकांतदादा पाटील आणि धर्मेंद्र प्रधान यांना ‘मातोश्री’वर धाडले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत चर्चा घडवून आणली. 123 भारतीय जनता पक्षाचे तर 63 शिवसेनेचे अशा 186 च्या मजबूत संख्येच्या आधारे भरभक्कम असे महायुतीचे सरकार 5 डिसेंबर 2014 रोजी खर्‍या अर्थाने राज्यात अधिकारारूढ झाले होते. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महायुती सत्ताधारी बनली आणि त्यात विनय कोरे यांची जनसुराज्य पार्टीसुद्धा सामील झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे असा शेतकर्‍यांचा संप झाला, मराठा आरक्षणावर 58 मोर्चे काढणारी मराठा क्रांती संघटना उदयाला आली.

15 वर्षे प्रश्न रेंगाळत ठेवणारे सत्ताधारी विरोधी पक्ष बनल्याने सैरभैर झाले होते, पण सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जबरदस्त विश्वासाने राज्यशकट कुशलतेने चालविताना तारेवरची कसरत करीत मुख्यमंत्री पदाची पाच वर्षे पूर्ण केली आणि वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा मान पटकावला. पांच वर्षात राज्यात झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे स्थान पहिल्या क्रमांकावर आणले. पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्याला त्याची योग्य ती जागा दाखवून देत विधानमंडळ आणि बाहेर विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपल्या वक्तृत्वाने आणि कर्तृत्वाने धोबीपछाड देण्यात मागेपुढे पाहिले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकर्‍यांना 60 हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यात थेट जमा करण्याची कामगिरी बजावली आणि त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद करणे राजकीय पंडितांना भाग पाडले. मराठा आरक्षणावर ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय घेऊन आजवरच्या तमाम मराठा नेत्यांना डोके खाजवायला भाग पाडले.

2019च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती अभेद्य व्हावी म्हणून सॉफिटेल, मातोश्री आणि हॉटेल ब्ल्यू सी येथे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत योग्य ती चर्चा केली आणि यापुढेही युती कायम राहावी यासाठी आपल्या ‘चाणक्य’नितीचे दर्शन घडविले. ‘यशस्वी देवेंद्र पर्व’ महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारताला दाखवून देताना भारतात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र येती काही वर्षे तरी हे समीकरण कायम राहील यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोठा भाऊ असे संबोधताना नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांचे मोठे भाऊ अशी उपमा दिली आणि योग्य ते संकेत दिले. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी व्यूहरचना आखली आहे. त्यांना त्यात यश येवो आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी नागरिकांना आच्छे दिन येवोत. यासाठी सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे सूत्र महायुतीच्या सर्वांनी तंतोतंत अमलात आणावे! जय महाराष्ट्र!!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply