Breaking News

पन्ना की तमन्ना है की हीरा मुझे मिल जाए…

देव आनंद यशापयशाने थांबणारा नव्हताच. त्याच्याभोवतीच्या वलयात हिट फ्लॉपचा परिणाम होत नसे. पिक्चर हिट झाला तरी तो उत्साहात, फ्लॉप झाला तरी त्यात अडकून न पडण्यात जणू तप्तर. देव आनंद एक वेगळेच रसायन. तो देव आनंद होता हो देव आनंद…
पन्नाशी जवळ आली तरी ’हीरो’गिरी करीत असतानाच तो ’प्रेम पुजारी’ (1970)पासून दिग्दर्शनात उतरला नि पहिल्याच प्रयत्नात फसला. म्हणून काय झालं? त्याने ’हरे राम हरे कृष्ण’ची तयारी सुरू केली. मुमताज नायिका, पण महत्त्वाचे होते ते हिप्पी कल्चरमध्ये एकदम ’सही’ अथवा ’फिट्ट’ बसणार्‍या अभिनेत्रीची. पडद्यावरची त्याची बहीण हवी होती. जाहिदाने (’गॅम्बलर’मध्ये ती त्याची प्रेयसी असते.) नकार दिल्यावर देवपुढे प्रश्न पडला आता कोण? अशातच एका फिल्मी पार्टीत देव आनंदसमोरच त्या काळातील नवोदित अभिनेत्री झीनत अमान येऊन उभी राहिली. देव आनंदची पर्सनॅलिटीचं अशी भारी की त्याचं पाहणं बघूनच युवती त्याच्याकडे आकर्षित होत. तोपर्यंत झीनतचा पहिला चित्रपट ओ.पी. रल्हन दिग्दर्शित ’हलचल’ (1970) पडद्याला बोज्या करून गेला होता. पब्लिकनेच न पाहिलेला पिक्चर देव आनंदनेही पाहिलेला असणं शक्यच नव्हते. या पार्टीत झीनत अमान देव आनंदच्या अगदी समोर येऊन उभी राहिली. आपल्या पर्समधून सिगारेट काढली, हातात धरली आणि देव आनंदकडे लायटर मागितला. पिक्चरमध्ये फिट्ट बसेल अशीच कडक सिच्युएशन. पन्नास-बावन्न वर्षांपूर्वी एकादी युवती सिगारेट ओढते हे एकदम धाडसी आणि एक्स्युझिव्हज असे. (आजच्या कार्पोरेट युगात खास युवतींसाठी सिगारेटचा वेगळे ब्रॅण्ड आहेत) देव आनंद या सगळ्या डेअरिंगबाज पिरियन्सकडे पाहतच राहिला. त्याला ’हरे राम हरे कृष्ण’मधील जसबीर सापडली. गॉसिप्स मॅगझिनमधून ही ’ग्रेट भेट’ फारच रंगवून साकारली गेली. देव आनंद आणि मीडिया एकमेकांचे प्रिय होतेच. झीनतचे मॉडर्न असणे, दिसणे, वागणे, बोलणे नि वैचारिक व शारीरिक उंची त्याला भारी आवडली. एव्हाना देव आनंदनेही जणू कात टाकत मॉडर्न व्हायचं पाऊल टाकले होते.
हा पिक्चर 1972च्या 21 जानेवारीला मुंबईत प्रदर्शित होण्यापूर्वीच झीनतची ’दम मारो दम गर्ल’ इमेज लोकप्रिय झाली होती. इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉक्सपासून रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमालापर्यंत सगळीकडेच दम मारो दम मीट जाए गम आणि हरे रामा हरे कृष्णा (हे इंग्लिशमिश्रित) या गाण्यांची प्रचंड धूम होती. त्या काळात पिक्चर रिलीज झाल्याशिवाय गाणी पडद्यावर कशी दिसतात याची अजिबात कल्पना येत नसे आणि त्यातच गंमत असे. फर्स्ट शोपासूनच पिक्चर हिट, झीनत अमान स्टार.
आता पिक्चर हिट म्हणजे नवीन चित्रपटांच्या ऑफर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत चलनी नाणे. झीनतची पहिली पसंती अर्थातच देव आनंद. त्याच्याच दिग्दर्शनातील ’हीरा पन्ना’मध्ये ती होतीच. आता दोन नायिका. एक राखी आणि दुसरी झीनत अमान. याच दिवसात गुलशन रॉय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ’जोशीला’ (1973)मध्ये हेमा मालिनी नायिका आणि कुछ भी करलो एक दिन तुमको या देव आनंदसोबतच्या स्टाईलिश रोमॅन्टीक गाण्यासह काही मोजकीच दृश्य असलेली भूमिका राखीने स्वीकारली होती. (यशजींसाठी की देव आनंदसाठी हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला, बरं का?) ’हीरा पन्ना’तही एक गाणे आणि काही दृश्ये एवढीच भूमिका तिने स्वीकारली. बंगालवरून मुंबईत आल्यावर राखीने हिंदी चित्रपट मिळवायच्या प्रयत्नात ’प्रेम पुजारी’च्या वेळी ती देव आनंदला भेटली होती, पण तोपर्यंत वहिदा रेहमान व जाहिदाची निवड झाली होती. ती भेट लक्षात ठेवूनच की काय राखीला तो संधी देत होता.
’हरे राम…’च्या खणखणीत यशानंतरचा देव आनंदच्या दिग्दर्शनातील चित्रपट म्हणून ’हीरा पन्ना’ची घोषणेपासूनच उत्सुकता. देव आनंद हा कुठेही असला तरी देव आनंदच असे आणि आपली शैली, इमेज, क्षमता व लोकप्रियता यानुसार वागे. ’हीरा पन्ना’चे मेहबूब स्टुडिओत सेट लावून पहिले चित्रीकरण सत्र पार पडल्याचे वृत्त आले, आनंद बक्षींची गाणी व राहुल देव बर्मनचे संगीत यातून काही गाण्यांचे रेकॉर्डिंग झाल्याचे फोटो मुद्रित माध्यमातून दिसू लागले (तेव्हा फक्त तेच माध्यम होते आणि जनसामान्यांपर्यंत अनेक गोष्टी पोहोचण्यास प्रभावी व पुरेसे होते). पिक्चरच्या फोटोत देव आनंद व राखी दिसत त्यापेक्षा देव आनंद व झीनत अमान जास्त लक्ष वेधून घेत. गळ्यात कॅमेरा अडकवलेला देव आनंद आणि कलरफुल बिकीनीतील झीनत अमान असा फोटो भारीच वाटे. (त्या काळात फक्त आणि फक्त इंग्लिश भाषेतील गॉसिप्स मुख्य रंगीत फोटो पाहायला मिळत आणि असे बोल्ड फोटो पाहताना आपल्याला कोणी बघत तर नाही ना याची फार फार काळजी घ्यावी लागे.(आजची डिजिटल पिढी तुलनेत नशीबवान की काय?)
पिक्चर पूर्ण होता होता गाण्याची ध्वनिमुद्रिकाही मार्केटमध्ये आली. त्यावरही एका बाजूस जाळीच्या पाळण्यातील बिकीनीतील झीनत अमानचे फोटो काढणारा देव आनंद हाच हुकमी फोटो. मुख्य प्रवाहातील चित्रपटात इतकं मोकळंढाकळं तसं नवीनच होतं. अथवा बी.आर. इशारा, राम दयाल, फिरोझ चिनॉय यांच्या पिक्चरमध्ये असे, पण एव्हाना देव आनंद पाश्चात्य शैलीत रमणारा होता, त्यात हे फिट्ट होते. आनंद बक्षींच्या गाण्यांना राहुल देव बर्मनचे संगीत हे हिट्ट समीकरण मस्त जमले होते. मै तस्वीर उतारता हू (पार्श्वगायक किशोरकुमार), पन्ना की तमन्ना है की (लता मंगेशकर व किशोरकुमार), बहुत दूर तुझे जाना है (लता मंगेशकर व किशोरकुमार), एक पहेली है तू (आशा भोसले व किशोरकुमार) ही गाणी ऐकता ऐकताच लोकप्रिय झालीदेखील. देव आनंद व चित्रपट संगीत हे कायमस्वरूपी हिट्ट समीकरण. अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटातील गाण्यात त्याने रंग भरल्याचे त्याचे वैशिष्ट्य त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील गीत संगीतात कायम राहिले यात आश्चर्य नाही. पूर्वीच्या अनेक कलाकारांनी रूपेरी पडद्यावर अधिकाधिक उत्तमपणे गाणे साकारण्याची कला अवगत होती. उगाच ते मोठी खेळी जिंकले नाहीत.
’हीरा पन्ना’ची गाणी लोकप्रिय पण पिक्चर रिलीज होत नव्हते. त्या काळात टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत (आजच्या शुक्रवारी मुंबईत तर पुढच्या शुक्रवारी दिल्लीत. त्यानंतर आणखी कुठे कुठे असा मोठाच वळणावळणाचा प्रवास. आपल्या गावात पिक्चर कधी येईल काय माहीत अशीच स्थिती) आणि त्या काळात चित्रपटाप्रमाणे मेन थिएटर मिळण्यासाठी निर्माते व वितरक वाट पाहत (चित्रपटाचा इतिहास असा बहुस्तरीय आहे.) काही कट्स देऊन पिक्चरला सेन्सॉरचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे वृत्त आले. आता वाटले, पिक्चर लवकरच रिलीज होईल. त्यातही त्या काळातील चित्रपट वितरणातील दादा मॉडर्न मुव्हीजचे गुलशन रॉय हे नवकेतन फिल्मच्या ’गाईड’पासूनचे वितरक आणि त्यांच्या त्रिमूर्ती फिल्मच्या ’जॉनी मेरा नाम’ (दिग्दर्शक विजय आनंद) आणि ’जोशीला’ (दिग्दर्शक यश चोप्रा) यात देव आनंद नायक. तात्पर्य, सगळे समीकरण जमून आलेले. चित्रपट प्रेक्षकांपर्यंत आणण्यास अशी अनेक गणिते जमून यावी लागतात. चित्रपटाचे जग अशा अनेक लहान मोठ्या गोष्टींनी खच्चून भरलंय. असं असूनही गुलशन रॉय यांनी ’हीरा पन्ना’च्या मुंबई विभागातील वितरणाचे हक्क घेऊ नये? काय बरे व्यावसायिक अडथळा असावा? या गडबडीत चित्रपट प्रदर्शित होणे लांबत गेले. इतके की 1973 ही संपले (दिवाळीत रिलीज झालेला ’जोशीला’ही रसिकांनी नाकारला). 1974च्या 1 फेब्रुवारी रोजी ’हीरा पन्ना’ रसिकांसमोर आला. त्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणूनच हा फोकस आणि त्यातही विशेष उल्लेखनीय गोष्ट या चित्रपटाच्या निमित्ताने नवकेतन फिल्म चित्रपट वितरण क्षेत्रात आले. हीदेखील एक बातमीच.
पिक्चरचे लेखन देव आनंद व सुरज सनिम यांचे. कला दिग्दर्शन टी. के. देसाई यांचे छायाचित्रणकार फली मिस्री यांचे, तर संकलन बाबू शेख यांचे. देव आनंदची टीम हुकमी. त्याच्या उत्फूर्तपणात सूर मिसळणारी.
थीम काय? फोटोग्राफर हीरा भंडारी (देव आनंद) आणि एअर हॉस्टेज अर्थात हवाई सुंदरी रीमा सिंग (राखी) यांचे प्रेमसंबंध छान रूजत असलेले. अशातच एका विमान अपघातात रीमाचे दुर्दैवाने निधन होते आणि त्यामुळे उदास उदास झालेला हीरा आपल्या फोटोग्राफीत मन गुंतवतो. अशातच राजासाब (रेहमान) यांचे फोटो काढत असतानाच पन्ना (झीनत अमान) त्यांचे किमती हीरे चोरून ते हीराच्या फॅशनेबल गाडीच्या पेट्रोलच्या टाकीत टाकते. आता हे हीरे तेथून मिळवायचे तर हीराशी मैत्रीचे नाटक करायला हवे. तो सुचवेल, सांगेल तसे बिकीनीत फोटो काढू देते, तर हीराला हे हीरे सापडताच ते तो पोलीसांकडे द्यायचे ठरवतो. तेव्हा ती आपण हे हीरे चोरले होते हे सांगते, पण का? तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनिलने (धीरजकुमार) पन्नाला धमकी देत आपल्या गुन्हेगारी टोळीत सामील केलेले असते. आपली ही स्टोरी ती सांगत असतानाच हीराच्या गळ्यातील लॉकेटमधील रीमाचा फोटो ती पाहते आणि आपण रीमाच्या बहीण आहोत असे हीराला सांगते. आता हीरा पन्नाला गुन्हेगारी टोळीतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतो आणि पिक्चर शेवटच्या भागाकडे जातो. आता यात एक गंमत आहे, पन्ना की तमन्ना है की ’हीरा’ मुझे मिल जाए हे पन्ना गाते ते ’गाडीत लपवलेल्या हिरे’ डोळ्यांसमोर ठेवून, फोटोग्राफर हीराला उद्देशून नाही. (येथे दिग्दर्शक दिसतो असं अजिबात म्हणायला नको.)
स्टोरीत फार नाट्यमय असे काहीच नाही. त्या काळात अनेक चित्रपटांत ’हीरे चोरी’ हा कॉमन फॅक्टर असे. (व्हीक्टोरिया नंबर 203पासून छैला बाबूपर्यंत अनेक चित्रपटांत ते दिसले). देव आनंद संपूर्ण चित्रपटभर आपण देव आनंद आहोत या ऐटीत छान वावरलाय. त्याचा उत्साह आपण अनुभवावा यासाठीच राखीने काम केल्याचे जाणवते आणि झीनत अमानने आपली ’दम मारो दम गर्ल’ इमेज अधिकच मोकळेढाकळेपणे पडद्यावर आणली, त्याला अभिनय म्हणता येणार नाही. ती म्हणेल, तसं तुमचे सर्टिफिकेटही नको. चित्रपटात जीवन, रेहमान, ए. के. हनगल, धीरजकुमार, सुधीर, पेंटल, शीतल, मनमोहन, मॅकमोहन यांच्याही भूमिका.
त्या काळात हिट गाणी पहायची तर थिएटरला जाण्याशिवाय पर्यायच नसे. ’हीरा पन्ना’ला जे काही सर्वसाधारण यश मिळाले ते त्यातील गाण्यामुळेच आणि लोकप्रिय गाणी चित्रपटाला सतत रसिकांसमोर ठेवत असतात आणि त्या काळात असा हिट गाणीवाला पिक्चर मॅटीनी शोला यायची आम्ही वाट पहात असू. तसा तो येई. देव आनंदचे अनेक चित्रपट असेच मॅटीनी शोला येत असत आणि पाहून होत.
’हीरा पन्ना’त दिग्दर्शक देव आनंद फारसा दिसला नाही, पण झीनत अमानच्या तो प्रेमात तो नाही ना आणि तीही त्याच्याकडे आकृष्ट झालेली नाही ना असे मात्र वाटले. (पिक्चर पहायचा म्हणजे फक्त गोष्ट पाह्यची नसते हो आणि गोष्टीत दम नसेल तर असं काही असतेच). जोडीने ’कलाबाज’, ’वॉरंट’, ’डार्लिंग डार्लिंग’, ’प्रेम शास्त्र’, ’इश्क इश्क इश्क’ या चित्रपटातून जोडीने काम केल्यावर एका फिल्मी पार्टीत झीनत अमान राज कपूरसोबत आली आणि नवीन गॉसिप्स जन्माला आले. तोपर्यंत देव आनंद टीना मुनिमसोबत ’देस परदेस’च्या शूटिंगमध्ये रमलादेखील.
’हीरा पन्ना’ त्याचा एक दिग्दर्शनीय नमुना होता इतकेच म्हणायचे नि यूट्यूबवर त्यातील गाणी एन्जॉय करायची. पन्नास वर्षांनंतरही ही गाणी पुन्हा पुन्हा तजेलदार वाटतात ही देव आनंद पुण्याई.
– दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply