भाजप युवा नेता सचिन गायकवाड यांची मागणी
पनवेल : वार्ताहर – मुंबई कामानिमित्त जाणार्या कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी कोरोनाची लागण झाल्याने त्याचा थेट परिणाम कामोठेवर होत आहे. दररोज पाच ते सहा रुग्ण संसर्ग बाधित मिळत असल्याने अखेर पनवेल महानगरपालिकेने कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. यामुळे कामोठेवासियांत भितीचे वातावरण आहे. अनेकजण आजारपण अंगावर काढत असून पालिकेकडून डोअर टू डोअर आरोग्य तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी भाजप चे नेते सचिन
गायकवाड यांनी केली आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या कामोठे उपनगराचे क्षेत्रफळ 2.76 चौ.किमी आहे. तर लोकसंख्या 1.13 लाख आहे. आत्तापर्यंत या उपनगरात तब्बल 56 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तर कामोठे वसहती मधील 5 रहिवासी याला बळी ठरले आहे. बहुतांश लागण झालेले रुग्ण हे मुंबईत कामाला गेल्यामुळे तिथे संसर्ग झाल्याने आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातील लोकांनाही याची लागण झालेली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. अनेक गृहनिर्माण सोसायटी सील करत नागरिकांना प्रतिबंध घातला आहे. दिवसाला पाच ते सात रुग्णांची वाढ होत असल्याने कामोठेत राहणारे नागरिक भयभयीत झाले आहेत.
वाढता संसर्ग फैलावू नये यासाठी पालिकेकडून डोअर टू डोअर आरोग्य तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. अनेकजण आजारपण अंगावर काढत आहेत. बहुतांश दवाखाने बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पालिकेकडून आरोग्य तपासणी मोहिम राबवावी आणि घराघरात जावून पनवेल महानगरपालिकेच्या वतीने मोहीम राबवावी असे नागरिकांचे तसेच सचिन गायकवाड यांचे म्हणणे आहे.
गावाला जायचे कसे?
पनवले महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या पैकी 40 ते 42 टक्के रूग्ण एकट्या कामोठ्यातील आहेत. त्यामुळे कामोठे बाहेर संसर्ग फैलावू नये यासाठी सदरचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. कामोठे हा संपूर्ण भागच संवेदनशील झाल्याने आता गावाला जायचे कसे हा प्रश्न पडला आहे. कामोठेत कोकण, पश्चिम महाराष्ट्र येथील बहुसंख्य नोकरदार मंडळी राहत आहेत. त्यामुळे अनेकांना गावी जायचे आहे. मात्र आता कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केल्याने आणि पोलीसांनीही प्रतिबंध केल्याने आता गावी जाणार्यांची मोठी अडचण झाली आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा
कामोठ्यात दिवसेदिवस रुग्ण वाढत असले तरी आता नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहेत. वारंवार विनंती पोलीस प्रशासनाकडून विनंती करुनही नागरिक दाद देत नाहीत. त्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठा ताण पडत आहेत. खरेदीच्या नावाने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक दिसत आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे.