Breaking News

कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज

कर्जत विधानसभा मतदारसंघात 2 लाख 81 हजार 877 मतदार असून या मतदारसंघात चार मतदान केंद्रे ही दुर्गम भागात असून 326 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या मतदानासाठी साधारण 1500 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील शेळके मंगल कार्यालयात होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांनी दिली.

2014मध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात 21 ऑक्टोबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. 27

सप्टेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. 4 ऑक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी 5 ऑक्टोबर रोजी होणार असून 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणूक लढविणार्‍या अधिकृत उमेदवार यांची त्यांनी घेतलेल्या निशाणीसह यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांना निवडणूक काळात 26 लाख रुपये खर्च करण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगाने दिली असून केलेल्या खर्चाचा दैनंदिन तपशील उमेदवारांना द्यावा लागणार आहे. या निवडणुकीसाठी 4

ऑक्टोबरपर्यंत नवीन मतदारांना नाव नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.

सध्या कर्जत विधानसभा मतदारसंघात 2011च्या जनगणनेनुसार 3 लक्ष 73485 लोकसंख्या असून त्यातील मतदार हे 2 लाख 81, 877 एवढे असून त्यात 4 ऑक्टोबरपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. कर्जत या 2014मध्ये निर्माण झालेल्या मतदारसंघात संपूर्ण कर्जत तालुका आणि खालपूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट आणि खोपोली नगर परिषद तसेच खालापूर नगरपंचायत यांचा समावेश आहे. मतदारसंघात कर्जत तालुक्यातील 186 गावे आणि खालापूर तालुक्यातील 92 अशा 278 गावांचा समावेश असून त्यात 81 ग्रामपंचायती, तर तीन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीचा समावेश आहे. या मतदारसंघात असलेल्या एकूण मतदारांपैकी 1,43,285 एवढे पुरुष मतदार असून 1,38,592 महिला मतदार आहेत. त्याचवेळी सैनिकी मतदार 63, तर अनिवासी भारतीय मतदारांची संख्या 14 एवढी आहे. त्यामुळे महिला आणि पुरुष मतदार यांचा सरासरी रेशो हा 1000 पुरुषांमागे 967 महिला असा आहे.

कर्जत तालुक्यात 206 मतदान केंद्र असून खालापूर तालुक्यात 120 मतदान केंद्र आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 1 लाख 89,577 म्हणजे 76.76 टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता, तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत 1 लाख 82,939 मतदारांनी म्हणजे 72.29 टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 1 लाख 61,915 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. कर्जत मतदारसंघात चार मतदान केंद्र ही दुर्गम भागातील मतदान केंद्र असून ती सर्व मतदान केंद्र ही कर्जत तालुक्यातील आहेत. त्यात कर्जत येथून 31 किलोमीटर अंतरावर तुंगी हे मतदान केंद्र असून तेथील मतदारसंख्या 344 एवढी असून ते अँभेरपाडा ग्रामपंचायतीमधील गाव आहे, तर पेठ हे मतदान केंद्र कर्जतपासून 29 किलोमीटर अंतरावर असून मोग्रज ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या त्या मतदान केंद्रात 274 मतदार आहेत. कळकराई हे मतदान केंद्र वदप ग्रामपंचायतमधील मतदान केंद्र असून ते मतदान केंद्र कर्जत शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर असून तेथील

मतदारसंख्या 100 एवढी आहे, तर ढाक हे मतदान केंद्र वदप ग्रामपंचायतीमधील असून तेथे 182 मतदार असून ते मतदान केंद्र कर्जतपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे.

या निवडणुकीचे नामांकन अर्ज दाखल करण्याचे आणि सर्व कामकाज हे कर्जत दहिवली येथील हायड्रो कॉलनी येथील प्रांत अधिकारी कार्यालय येथे आहे. निवडणुकीची नामांकन अर्ज स्वीकारण्याची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांच्या मदतीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार विक्रम देशमुख, इरेश चप्पलवार आणि माथेरानचे भोई अधीक्षक म्हणून काम पाहणार असून दोन निवासी नायब तहसीलदार आणि सहा नायब तहसीलदार तसेच पालिका मुख्याधिकारी हे अन्य अधिकारीदेखील मदतीला आहेत. निवडणुकीसाठी 1500हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी यांची निवड केली असून त्यात 326 मतदान केंद्रांवर लागणारे 5 अधिकारी तसेच कर्मचारी आणि शिपाई यांची निवड केली असून त्या सर्व जागांसाठी प्रत्येकी 10 राखीव कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी ईव्हीम मतदान यंत्र, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिन यांची संख्या मतदान केंद्राच्या संख्येनुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तिन्ही मशिन आगाऊदेखील उपलब्ध राहणार असून क्षेत्रीय अधिकारी हे मतदानाच्या दिवशी 21 ऑक्टोबर रोजी सतत फिरत राहणार आहेत.

आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठीदेखील निवडणूक यंत्रणा सज्ज असून भरारी पथके आणि खर्चाचा हिशेब ठेवणारी पथके कार्यरत झाली आहेत. दरम्यान, मतदारसंघातील 808 दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरातून मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि पुन्हा घरी सोडण्याचे नियोजन केले जात आहे.

21 ऑक्टोबर रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यात 206 आणि खालापूर तालुक्यात 120 मतदान केंद्र बनविण्यात आली आहेत. त्यापैकी खोपोली येथील चार मतदान केंद्र ही इमारतीच्या पहिल्या मजल्यावर होती, पण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने यापुढे सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर असावीत, असे निर्देश असल्याने खोपोलीमधील विहारी येथील तीन आणि वरची खोपोली येथील एक मतदान केंद्र आता तळमजल्यावर असणार आहे. दिव्यांग मतदार यांच्यासाठी त्या ठिकाणी रॅम्प असणार आहेत, परंतु मतदारसंघात असलेल्या सर्व 808 दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरातून शासकीय वाहनाने मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी 47 क्षेत्रीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्या सर्व मतदारांना वेळ दिली जाईल आणि त्या वेळेत सर्वांना क्षेत्रीय अधिकारी घेऊन येतील आणि पुन्हा घरी सोडतील. कर्जत विधानसभा मतदारसंघात खोपोली शिळफाटा येथील पटेलनगरमधील 260 क्रमांकाचे मतदान केंद्र या निवडणुकीतील सर्वात मोठे मतदान केंद्र असून त्या ठिकाणी 1470 मतदार आहेत, तर सर्वांत कमी मतदार कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या कळकराई या 179 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर केवळ 100 मतदार आहेत. तुंगी, ढाक, कळकराई येथे वाहने थेट मतदान केंद्रापर्यंत जात नाहीत. त्याच वेळी पेठ या दुर्गम भागातील मतदान केंद्रापर्यंत वाहन जाते, परंतु सध्या पावसाळा असल्याने तेथे वाहने पोहचणार नाहीत. त्याच वेळी माथेरानमधील चार मतदान केंद्रांपर्यंतदेखील वाहने जात नाहीत. त्यामुळे दस्तुरी नाका येथे मतदान साहित्य गाडीमध्ये नेऊन पुढे स्थानिक पर्यायांचा वापर केला जाणार आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघात असलेल्या एकूण मतदारांपैकी 97.97 टक्के मतदारांचे फोटो हे मतदार यादीवर दिसणार आहेत. त्या वेळी मतदान यंत्रात प्रत्यक्ष मतदान होणार्‍या मतपेटीवर उमेदवार, त्यांची निशाणी आणि फोटोदेखील असणार आहे. अशा वेळी अंध मतदारांना मतदान यंत्रावरील नावे समजावीत यासाठी ती ब्रेल लिपीत राहणार आहेत. त्याशिवाय त्यांच्या मदतीला क्षेत्रीय अधिकारीदेखील असणार आहेत. दिव्यांग 808 मतदारांची जबाबदारी कर्जत आणि खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच कर्जत आणि खोपोली नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर प्रामुख्याने देण्यात आली आहे. या निवडणुकीत निवडणूक लढविणार्‍या सर्व उमेदवारांनी आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी ही दैनिक वृत्तपत्र आणि दूरचित्रवाहिनीवर प्रत्येकी तीन वेळा तीन वेगवेगळ्या दिवशी प्रसिध्द करायची असून प्रत्यक्ष मतदानाच्या 48 तास आधी त्या गोष्टी निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांना कराव्या लागणार आहेत.

मतदारांनी अधिक संख्येने मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे यासाठी महसूल विभागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी हे गावोगावी जाऊन मतदारांपुढे मतदानाचे महत्त्व सांगणारी जनजागृती करणार आहेत. त्याच वेळी पथनाट्य, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट-गाईडचे विद्यार्थी यांच्या माध्यमातूनदेखील जनजागृती केली जाणार आहे. या उमेदवारांना आपला दैनंदिन खर्च दुसर्‍या दिवशी द्यावा लागणार आहे. हे लक्षात घेऊन खर्च विभागही कार्यरत झाला आहे.

-संतोष पेरणे

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply