नवी मुंबई : बातमीदार
कोरोनाकाळात मास्क स्क्रिनिंग तसेच ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन तपासणी करणे, आरोग्य केंद्रांवरील ड्युटी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन तास या दुहेरी जबाबदार्या प्रामाणिकपणे बजावून सुद्धा नवी मुंबईतील ठोक मानधनावर कार्यरत शिक्षक महापालिकेकडून तसेच राज्यसरकारकडून दुर्लक्षित केले जात असल्याने ह्या शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे.
दरम्यान, महापालिकेला मदत म्हणून ह्या शिक्षकांनी महिन्यातील 15 दिवस काम करावे नंतर शेवटचे 15 दिवस शिक्षकांना कार्यमुक्त केले जाईल या आयुक्त अभिजित बांगर यांच्या आश्वासनाला दोन महिने उलटून गेले. त्यामुळे आयुक्तांनी आमच्याप्रमाणे कोरोना परिस्थितीत स्वतचा जीव धोक्यात घालून 18 हजार रुपयात संसाराची जबाबदारी उचलून दाखवावी असे संतापजनक आव्हान ठोक मानधनावर कार्यरत असणारे शिक्षक करत आहेत.
नमुंमपा शिक्षण मंडळामध्ये गेली कित्येक वर्षांपासून ठोक मानधनावर शिक्षकांची नियुक्ती केली जाते. सुरूवातीला सहा महिने व आता प्रत्येक तीन महिन्यांसाठी शिक्षकांची भरती केली जाते. चालु परिस्थितीत 150हून अधिक शिक्षक ठोक मानधनावर कार्यरत आहेत. तीन महिन्यांसाठी त्यांची हीनियुक्ती असली तरी ते गेल्या तीन वर्षापासून शिक्षण मंडळामध्ये ते कार्यरत आहेत. मात्र या शिक्षकांची खरी गळचेपी होते ती ह्या संकटकाळात
दरम्यान, जगावर ओढवलेल्या कोरोना संकटकाळात या शिक्षकांना महापालिकेने विविध जबाबदार्या सोपविल्या आहेत. याशिवाय मूळ शिक्षकी पेशा असल्याने मुलांचे ऑनलाइन वर्ग घेणे, त्यांना गृहपाठ देणे, सर्व अहवाल तयार करून शाळेला – महापालिकेला पाठवत जाणे. या दुहेरी जबाबदार्या गेली सहा महिने हे शिक्षक उत्तम पद्धतीने पार पाडत आहेत. मात्र हे करत असताना दुसरीकडे या शिक्षकांच्या भविष्याचा व आरोग्याचा विचार महापालिकेने करणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात मात्र महापालिकेने ठोक मानधनावर कार्यरत शिक्षकांना दुर्लक्षित करत आपल्या अकार्यक्षम महापालिकेतील कर्मचारी-अधिकार्यांचा हाताशी राबविण्यासाठी ठेवले असल्याचे पाहायला मिळत आहे.
वारंवार शिक्षकांकडून मानधन वाढवे, अशी मागणी करून देखील नमुमपा आयुक्त बांगर यांनी अद्याप मानधन वाढीविषयी शब्दही काढलेला नाही. याशिवाय 15 दिवस शिक्षक कार्यरत राहतील, नंतर महिन्यातील शेवटचे 15 दिवस रोटेशनल पद्धतीने शिक्षक कार्यमुक्त होतील अशी स्वतः त्यांनी केलेली घोषणा देखील आयुक्त बांगर यांनी पाळली नसल्यानेआयुक्त दिवस ढकलत आहेत की जबाबदारीतून पळ काढत आहे? असा सवाल सर्व शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.
कोरोनाकाळात विविध योजनांतर्गत काम करून घेताना शिक्षकांना कोणतेही प्रवासी भत्तेही महापालिकेकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे मिळणारा पगार 20 हजार रुपये त्यातून भविष्यनिर्वाह निधी आणि येण्याजाण्यासाठी लागणारा प्रवास खर्च मिळून हाती केवळ 15 हजार रुपयाची रक्कम हातात येते. यातून स्मार्ट सिटीमध्ये भाड्याने घर असले तरी पाच हजार रुपये भाड्यापोटी जातात. तसेच घरखर्च भागवितानाही या शिक्षकांना तारेवरची कसरत सध्या करावी लागत आहे.
आम्ही शिक्षकांच्या कामाविषयी आदर बाळगतो, त्यांनी केलेले काम उत्तमच आहे. ठोक मानधनावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनाविषयी आम्ही सकारात्मक आहोत. लवकरच येणार्या बैठकीत आयुक्त याबाबत निर्णय घेतील
-योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई मनपा