पनवेल परिसरातील पनवेल, खारघर, तळोजा, नवीन पनवेल अशा ठिकाणी शाखा असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारांत आर्थिक अनियमितता असल्याची शंका आहे. पै न् पै गोळा करून आयुष्यभराची कमावलेली पुंजी लोकांनी अत्यंत विश्वासाने बँकेत ठेवली, पण आता दिवाळीच्या तोंडावर आपलेच पैसे आपल्याला मिळत नसल्याने सभासदांची पाचावर धारणा बसली आहे. ग्राहकांच्या तक्रारींच्या आधारावर अर्थतज्ज्ञ किरीट सोमय्या यांनी बँकेत घोटाळा झाल्याची शंका उपस्थित केली आहे. सहकार आयुक्तांनी बँकेच्या व्यवहारांकडे गांभीर्याने पाहायला हवे. वेळीच पीएमसी बँकेप्रमाणे या बँकेवरही निर्बंध घालायला हवेत.
कोकणात सहकार रुजत नाही, असे बोलले जाते, पण काही वर्षांपूर्वी कोकणात सहकार रुजला, फोफावलाही, मात्र केवळ रायगड जिल्ह्याचाच विचार केला तर डोळ्यांदेखत अनेक सहकारी बँका बुडाल्या व लोकांनी आता सहकारी बँकांचा धसकाच घेतला आहे. नावाजलेल्या पेण अर्बन बँकेचे सभासद आजही आपली पुंजी मिळावी यासाठी याचना करीत आहेत. गोरेगाव अर्बन बँक, रोहा-अष्टमी, सिध्दिविनायक अशा उत्तम स्थितीत वाटणार्या जिल्ह्यातील सहकारी बँका बुडाल्या. पेण अर्बन बँकेचे प्रकरण ताजे असतानाच आता कर्नाळा सहकारी बँकेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अनेक दिवस हा विषय चर्चेत आहे. ग्राहक आपले पैसे मिळावेत यासाठी आरडाओरड करीत आहेत. त्यातच बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी ‘पैसे देणार नाही, काय करायचं ते करा,’ अशी धमकी दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणमधील भाजपचे नेते महेश बालदी यांच्याकडे ग्राहकांच्या तक्रारी आल्यानंतर अखेर उभय नेत्यांनी अर्थतज्ज्ञ, माजी खासदार किरीट सोमय्या यांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. शनिवारी सोमय्या यांनी पनवेल येथे येऊन कर्नाळा बँकेच्या सभासदांशी संवाद साधला. या वेळी धक्कादायक वास्तव समोर आले. सभासदांचे अनुभव भुवया उंचावणारे होते. एकाने तर आपल्या खात्यावर अनेक एण्ट्री दिसल्याचे सांगितले, पण आपण काहीच व्यवहार या खात्यातून केला नव्हता. याचा अर्थ आपल्या खात्याचा गैरवापर झाल्याचे नमूद केले. बँकेचे अधिकारी बँकेचे पैसे व्याजाने देतात, अशीही खळबळजनक माहिती सभासदांकडून पुढे आली. काहींचा बँकेशी दूरान्वेही सबंध नसतानाही त्यांच्या जमिनीवर बोजा चढविला गेला. बँकेत घोटाळा झाला, असे ठामपणे सांगता येणार नाही, पण ग्राहकांचे हे अनुभव चक्रावणारे आहेत. सामान्य माणसाने विश्वासाने आपले पैसे या बँकेत ठेवले. रायगडात नवे प्रकल्प येत असल्याने जमिनींच्या मोबदल्यात मिळालेले पैसेही बँकेत ठेव स्वरूपात ठेवले. आता त्यांना या पैशांची चिंता लागली आहे. एका तरुणाला वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज असून ती महिनाभरात पूर्ण होऊ शकली नाही. आजारपण, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते कसे भरायचे, या चिंतेत कर्नाळा बँकेचे सभासद आहेत. बहुतांश सभासद सामान्य आहेत. त्यामुळे त्यांची काळजी स्वाभाविक आहे. चर्चा होत आहे, पण केवळ चर्चा होऊन उपयोग नाही. सहकार खात्याने यात जातीने लक्ष घालायला हवे. काही गडबड वाटत असेल, तर वेळीच बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घालायला हवेत. आरबीआयनेही गोरगरिबांचे पैसे बुडू नयेत यासाठी वेळीच ठोस पावले उचलायला हवीत. फार उशीर झाला तर गोरेगाव, पेण अर्बन, रोहा-अष्टमीसारखी स्थिती व्हायला वेळ लागणार नाही.