Breaking News

खोपोली नगरपालिका हद्दीतील लौजी परिसरात पाणीटंचाई

खोपोली : प्रतिनिधी

वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतरही  खोपोली नगरपालिकाहद्दीतील लौजी गाव तसेच उंचावर असलेल्या रहिवाशी भागांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लौजी गावाला कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत.

खोपोली नगरपालिकेची वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहरात सर्वत्र पुरेशा दाबाने मुबलक पाणीपुरवठा होईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र लौजी या दोन ते अडीच हजार लोकवस्तीच्या गावाला वाढीव पुरवठा योजनेचा काहीही लाभ झालेला नाही. सध्या या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे मात्र खोपोलीच्या काही भागांत गरजेपेक्षा अधिक पाणीपुरवठा सुरू असल्याने येथे हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खोपोलीत एका बाजूला मुबलक पाणी तर काही भागांत पाण्याचा दुष्काळ अशी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त भागातील नागरिकांच्या संतापाचा सामना नगरपालिका प्रशासनास करावा लागत आहे.

रस्ते क्रॉसिंग व इतर तांत्रिक अडचणीमुळे  लौजीसहित अन्य काही भागांत वाढीव पाणीपुरवठा योजनेची कामे रखडली आहेत. लवकरच ती कामे पूर्ण होऊन सर्व भागांत समान व सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल.

-राजू गायकवाड, पाणीपुरवठा सभापती, खोपोली नगरपालिका

लौजी गावात अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. याबाबत आम्ही वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेकडून कोणतीच उपाययोजना होत नाही. येथील पाणीटंचाईची नगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून योग्य दखल घेण्याची आवश्यकता आहे.

 -किशोर पाटील, रहिवासी, लौजी-खोपोली

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply