Breaking News

अलिबागमध्ये युतीशिवाय पर्याय नाही

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अलिबाग विधानसभा मतदारसंघात काय घडेल, याची चर्चा रंगत आहे. कारण अपवाद वगळता अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे पंडित पाटील विजयी झाले होते. त्या वेळी त्यांनी शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात शेकापविरोधात नाराजी आहे, परंतु ही नाराज मते आपल्याकडे वळवून घेण्यात अलिबागमधील नेते कमी पडतात. विरोधकांमध्ये एकी नाही त्याचा फायदा शेकापला होतो. विरोधक जर एकत्र आले तर या विधानसभा मतदारसंघात शेकापचा पराभव होऊ शकातो, असे आकडेवारी सांगते.

2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अलिबाग मतदारसंघात काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांनी शेकापच्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचा पराभव केला होता. याचे कारण त्या वेळी शेकापला मते द्यायची नाही तर कुणाला द्यायची याचे उत्तर जनतेकडे होते. जनतेला पर्याय सापडला होता. त्यामुळे 2004 साली चमत्कार घडला. 2009 साली मात्र तसे दिसले नाही. विरोधकांमध्ये एकी नसल्यामुळे मीनाक्षी पाटील यांनी मधुकर ठाकूर यांचा तीन हजार मतांनी पराभव केला. 2014 साली तिरंगी लढत झाली. त्याचा फायदा शेकापला झाला. पंडित पाटील विजयी झाले. महेंद्र दळवी यांनी 65 हजार मते मिळवली होती. मधुकर ठाकूर तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. महेंद्र दळवी यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली होती. त्यांना प्रचारालादेखील फार कमी दिवस मिळाले होते. तरीदेखील त्यांनी मिळवलेली मते विरोधकांना विचार करायला लावणारी होती. भाजपचे प्रकाश काठे, तर राष्ट्रवादीचे अ‍ॅड. महेश मोहिते

हेदेखील उमेदवार होते. जनतेसमोर योग्य पर्याय असेल आणि विरोधकांमध्ये एकी असेल, तर अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेकापचा पराभव करता येतो हे सिध्द झाले आहे.

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळची परिस्थिती आणि 2019 साली होणार्‍या विधानभा निवडणुकीच्या वेळची परिस्थिती वेगळी आहे. 2014 साली महेंद्र दळवी यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. त्या वेळी त्यांना प्रचारासाठी पुरेसा कालावधी मिळाला नव्हता. 2014 साली महेंद्र दळवी पराभूत झाल्यानंतर ते गप्प बसले नाहीत. त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सतत जनतेच्या संपर्कात राहिले. अलिबाग व मुरूड या दोन तालुक्यांमध्ये शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद सदस्य आहेत. 2014 साली भाजप-शिवसेना युती नव्हती. या वेळी भाजप-सेना युती झाली आहे. काँगे्रसची परिस्थिती वाईट आहे. मागच्या वेळी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती ते अ‍ॅड. महेश मोहिते भाजपत आले आहेत. शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी असली तरी काँग्रेस या मतदारसंघात आपला उमेदवार उभा करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अलिबाग तालुक्यात नाही. चणेरे विभागात राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामुळे आघाडी झाली असली तरी शेकापला आपल्या ताकदीवरच लढायचे आहे. पूर्वी अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेकाप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत व्हायची. 2014 साली त्यात बदल झाला. शेकाप विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. काँग्रेसचा उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर गेला. या निवडणुकीनंतर अलिबाग विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती हळूहळू बदलली. अनेक जण काँग्रेस सोडून गेले. राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपत प्रवेश केला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाली. त्यामुळे या वेळीदेखील शेकाप विरुद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे.

शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी असली तरी ती नेत्यांची आहे. कार्यकर्ते ही आघाडी मानायला तयार नाहीत. काँग्रेस तर आपला उमेदवार उभा करणार आहे. 2014 साली मतदारांसमोर ठोस पर्याय नव्हता. या वेळी येथील जनतेला एक पर्याय आहे. तो म्हणजे भाजप-शिवसेना युतीचा.  मागील पाच वर्षांत महेंद्र दळवी यांनी आपली ताकद वाढवली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे अलिबाग विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे झाली आहेत. अलिबाग व मुरूड तालुक्यात भाजपने आपली ताकद वाढवली आहे. नुकताच अलिबाग तालुक्यातील बामणगाव आणि कुर्डूस येथील सरपंचांनी भाजपत प्रवेश केला. या दोन्ही ग्रामपंचायतींत शेकापची ताकद आहे. ती भाजपने कमी केली आहे. शिवसेना व भाजप एकत्र आल्यामुळे अलिबाग विधानसभा मतदारसंघात युतीची ताकद वाढली हे वास्तव नाकारता येणार नाही. शेकापच्या कार्यपद्धतीवर मतदार नाराज आहेत. त्यामुळे अलिबाग विधानसभा मतदारसंघात युती शेकापला पर्याय आहे. फक्त युतीच्या नेत्यांनी मनापासून एकत्रित काम करून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न करायला हवेत.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply