
उरण : रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यात पावसाळ्यातील भातशेती व त्यानंतर काही प्रमाणात भाजीचे पीक याशिवाय दुसरे पीक घेतले जात नव्हते, परंतु सध्या शेतकरी फळझाडांच्या लागवडीकडे वळू लागला आहे. वर्षभरात 11 हेक्टर फळलागवड क्षेत्राची वाढ झाली आहे.
पारंपरिक पिकांपेक्षा हमखास नगदी उत्पन्न देणार्या फळ पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकर्यांना विनंती केली जात होती. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शेतकरी सध्या फळशेतीचा मार्ग धरला आहे.
उरण विभाग हा कोकणाचाच एक भाग आहे. येथील माती ही फळपिकांसाठी उत्तम आहे. त्यामुळे उरणमध्ये पारंपरिक भातशेतीच्या जोडीला फळपीक लागवड करण्याचा कल सध्या वाढू लागला आहे. तसे प्रयत्नही उरणमधील शेतकर्यांकडून केले जात आहेत.
उरणच्या चिरनेर, केगाव, नागाव आदी परिसरांत कोकणातील सर्वोत्तम ठरलेला हापूस, केशर आंबा, पेरू, जांभूळ, पपई या फळझाडांना पोषक हवामान आहे. डोंगरप्रवण क्षेत्र असल्याने फळपीक लागवडीसाठी हा परिसर
सर्वोत्तम मानला जात आहे. याच परिसरात असलेल्या रानसई धरण परिसरात असलेले ओढे, नाले तसेच नैसर्गिक झरे अशा प्रकारचे पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत. या भागात मोठ़या प्रमाणात पडीक डोंगराळ परिसर आहे. यामध्ये समूह शेतीचा प्रयोग केल्यास उरणमध्ये उच्च प्रतीची फळे निर्माण होऊ शकतात.