मुरूडमध्ये 14 तास वीज गायब; नागरिकांचे हाल
मुरूड : प्रतिनिधी
मान्सूनचे आगमन झाले आणि पहिल्या पावसात महावितरणने वीज गायब केली. मुरूडमध्ये तब्ब्ल 14 तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
मुरूडमध्ये शुक्रवारी (दि. 10) रात्री तुरळक पाऊस पडला. पावसाचे प्रमाण कमी असले तरी महावितरणने बत्ती गुल केली. शुक्रवारी रात्री 9 वाजता जी वीज गायब झाली ती दुसर्या दिवशी सकाळी 11 वाजता आली. त्यामुळे लोकांना रात्र काळोखात काढावी लागली तसेच अनेकांना झोपसुद्धा मिळाली नाही.
वास्तविक महावितरणकडून विजेत सातत्य राखण्यासाठी पावसाळ्याआधी कामे हाती घेऊन तयारी केली जाते. तरीदेखील थोड्याशाच पावसात वीज का गायब होते हे नागरिकांना अद्याप न उलगडलेले कोडे आहे. रात्री अचानकपणे वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे. तुरळक पाऊस पडताच जर महावितरण वीज घालवत असेल, तर अजून पावसाचे अनेक दिवस जायचे आहेत. मग मुसळधार पाऊस पडल्यास काय होणार, असा सवाल लोक विचारत आहेत. याबाबत मुरूड महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महादेव दातीर यांनी मुख्य विद्युतवाहिनीवर झाड पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. आमच्या कर्मचार्यांनी तो सुरळीत केला आहे, असे सांगितले, मात्र 14 तास वीज नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.