
म्हसळा : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत श्रीवर्धन मतदारसंघ व उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या कार्यक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी कंबर कसली आहे. त्याकरिता आचारसंहिता घोषित झाल्यापासून श्रीवर्धन, म्हसळा व दिघी सागरी पोलीस ठाण्यांर्तगत मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी (दि. 5) म्हसळा शहरातील पाभरे नाका ते दिघी नाका या भागात उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला होता. म्हसळा पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, श्रीवर्धन पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, दिघी सागरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, पोलीस उपनिरीक्षक दीपक डूस यांसह सुमारे 100 पोलीस कर्मचारी व होमगार्ड या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते.
विधानसभा निवडणुकीत मतदारांना निर्भयपणे मतदानाचा अधिकार बजावता यावा याकरिता पोलिसांकडून तालुक्यातील 70 मतदान केंद्रांचा आढावा घेण्यात आला आहे.
-अश्वनाथ खेडकर, पोलीस निरीक्षक, म्हसळा
निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीवर्धन, म्हसळा, दिघी सागरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आवश्यक पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. नाकाबंदीत संशयित वाहनांची झडाझडती घेण्यासह फिरत्या पथकांमार्फत गैरकृत्यांवर नजर ठेवून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
-बापूसाहेब पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन