Breaking News

कोकण रेल्वे होणार सुसाट, दुपदरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू, क्रॉसिंग यंत्रणेमुळे गाड्यांना मिळणार गती

माणगाव : प्रतिनिधी

कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. त्याचबरोबर पाच नवीन क्रॉसिंग यंत्रणा उभारण्यात येत असून, इंदापूर (जि. रायगड) रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढवण्याचे आणि क्रॉसिंग यंत्रणा उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या सुसाट धावतील,  अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत.

माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित व जलद व्हावा यासाठी 44 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, विद्युतीकरण व 11 नवीन स्टेशन आणि पाच स्टेशनमध्ये नवीन क्रॉसिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील इंदापूर, सापे आणि वामणे या तीन रेल्वे स्टेशनचा

समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर व गोरेगावसारखी अनेक स्टेशन्स गैरसोईने युक्त आहेत. या स्टेशन्सचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या स्टेशनमध्ये प्रतीक्षागृह, आरक्षण कक्ष व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यावर आतापर्यंत 14.58 कोटी रुपये खर्च झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील वेरवली स्टेशनसाठी 15.03 कोटी खर्च झाला असून तेथेही क्रॉसिंग यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या स्थानकांत प्रतीक्षागृह, आरक्षण व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.  कोकण रेल्वेचे रोह्यापर्यंत दुपदरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्यापुढेही दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. या रेल्वे मार्गावर गाड्यांची संख्या वाढत असल्याने क्रॉसिंगची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे प्रवासाला जास्त वेळ लागतो. त्याची दखल घेऊन कोकण रेल्वेने पाच स्टेशनमध्ये नवीन क्रॉसिंग यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील सापे, इंदापूर व वामने तर रत्नागिरीतील वेरवली स्टेशनचा समावेश आहे.

Check Also

नमो चषक अंतर्गत कामोठ्यात रस्सीखेच स्पर्धा : नाव नोंदणीची 5 फेब्रुवारी अंतिम तारीख

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक …

Leave a Reply