कर्जत : बातमीदार
कर्जत-लोणावळा रेल्वेमार्गावरील पावसाळ्यात हाती घेण्यात आलेली दुरुस्तीची कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे या रेल्वेमार्गावरून धावणार्या अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचे सत्र सुरूच आहे. परिणामी प्रवाशांचे हाल सुरू आहेत. दरम्यान, कर्जत -लोणावळा रेल्वेमार्गावर सुरू असलेले दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटना करीत आहेत.
बोरघाटात जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. त्याआधी कर्जत-
लोणावळादरम्यान घाटात मालगाडी घसरल्याने कर्जत-
लोणावळादरम्यान रेल्वेसेवा खंडित झाली होती. मध्य रेल्वे प्रशासनाने 28 जुलैपासून 9 ऑगस्टपर्यंत वाहतूक बंद ठेवली होती. तेव्हापासून कर्जतहून पुण्याकडे जाणार्या अनेक गाड्या रद्द करण्याचे सुरू झालेले सत्र आजही कायम आहे. पुणे-पनवेल-भुसावळ गाडीचा मार्ग बदलला आहे, तर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस ही गाडी पुण्यावरून कोल्हापूर अशी चालविली जात आहे. मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस रद्द आहे, तर मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस ही कर्जतला न थांबता पुण्याकडे जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आता दिवाळीदेखील कर्जत-पुणेदरम्यान प्रवास करणार्यांना त्रासदायक ठरली आहे.
दरम्यान, मागील 15 दिवस सातत्याने पाऊस असतानादेखील दुरुस्तीची कामे विनाअडथळा पूर्ण करण्यावर मध्य रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे, परंतु आजही ही कामे सुरू आहेत.
पावसाळ्यात कर्जत-लोणावळादरम्यान असलेल्या बोरघाटातील रेल्वेमार्गावर दोन वेळा अपघात झाले आहेत. त्यामुळे दक्षिण-पूर्व घाटात दुरुस्तीची कामे करण्यासाठी कर्जत-लोणावळा मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आहेत. मुंबई-पुणेदरम्यान धावणार्या एक्स्प्रेस गाड्या 26 जुलैपासून 9 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या 30 नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याचे लक्षात घेऊन मध्य रेल्वेने बोरघाटात दुरुस्तीची कामे हाती
घेतली आहेत.
मध्य रेल्वेकडून बोरघाटात करण्यात येत असलेल्या दुरुस्तीच्या कामाबद्दल आम्ही सतत माहिती घेत असतो. प्रवाशांचे हाल कमी व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याची सूचना रेल्वे प्रशासनाला केली आहे. -केतन शहा, अध्यक्ष, कर्जत पॅसेंजर असोसिएशन