Breaking News

खोपोलीतील मैदाने झाली दारू पिण्याचे अड्डे

खालापूर : प्रतिनिधी

खोपोली शहरातील सार्वजनिक बागा, मैदाने रात्रीच्या अंधारात दारू पिणार्‍यांसाठीच राखीव असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या सुट्या लागल्यानंतर दारू पिणार्‍यांनी आपला मोर्चा विविध शाळांची पटांगणे व खुली क्रीडांगणे येथे वळविला आहे. शहरातील जनता विद्यालयाच्या पंत पाटणकर क्रीडांगणासह अन्य खुल्या मैदानांवर अंधार होताच दारूच्या जोरदार ओल्या पाटर्या होत आहेत.

नियमानुसार सार्वजनिक जागा, क्रीडांगणे, शैक्षणिक क्षेत्र, उद्यान येथे दारू पिण्यास सक्त मनाई असताना खोपोलीत मात्र अशा सर्व ठिकाणी बिनदिक्कत दारूच्या पाटर्या होत आहेत. अशा ठिकाणी दारू पिणा़र्‍यांत तरुणाईची संख्या सर्वाधिक दिसत असून, शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण अशा सार्वजनिक ठिकाणी दारूच्या पाटर्या आयोजित करण्यात आघाडीवर असल्याचे चित्र आहे. सध्या दारू पिण्यासाठी सुरक्षित जागा म्हणून खोपोलीतील विविध खुल्या मैदानांसह जनता विद्यालयाचे पंत पाटणकर पटांगण, गिरनार कॉर्नर येथील भाऊ कुंभार मैदान, टाटा पॉवर कंपनीचा रस्ता, चिंचवली डीपी रस्ता व या परिसरातील मैदान आदी ठिकाणी मोठ्या संख्येत रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत तरुणांच्या दारूच्या पार्ट्या रंगत आहेत.

सार्वजनिक क्रीडांगणे किंवा खेळाच्या मैदानावर दारू पिण्याचा प्रकार अतिशय निंदनीय आहे. तरुणाई कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे याचे हे भयावह चित्र आहे. याची दखल नगरपालिका व पोलिसांनी घेण्याची गरज आहे. 

-बाबू पुजारी, सामाजिक कार्यकर्ते, खोपोली

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यावर कायद्याने बंदी आहे. खोपोलीमध्ये असे प्रकार होत असतील तर त्यासंबंधी विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यासाठी मोहीम सुरू केली जाईल.

-धनाजी क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, खोपोली

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply